दहीहंडी आयोजकांची डीजेसाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 02:25 AM2017-08-15T02:25:14+5:302017-08-15T02:25:35+5:30
पोलिसांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप करत साऊंड व लाइट व्यावसायिकांनी मंगळवारी स्वातंत्र्यदिनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे.
नवी मुंबई : पोलिसांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप करत साऊंड व लाइट व्यावसायिकांनी मंगळवारी स्वातंत्र्यदिनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे दहीहंडी आयोजकांना डीजेच्या शोधात फिरावे लागत आहे. सोमवारी रात्रीपर्यंत अनेकांना डीजेची सोय झालेली नव्हती. यामुळे हंडी फोडताना डीजेच्या तालावर गोविंदांचे पाय थिरकतील की नाही याबाबत साशंकता आहे.
ध्वनिक्षेपकासाठी कमाल ७५ डेसिबलपर्यंतची आवाजाची मर्यादा आखून देण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात साऊंड व लाइट व्यावसायिकांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. ऐन स्वातंत्र्यदिनी त्यांच्याकडून मूक आंदोलनाचे शस्त्र उपसले गेल्यामुळे दहीहंडी आयोजकांची चांगलीच कोंडी झाली आहे. यंदा स्वातंत्र्यदिन व दहीहंडी एकत्र आल्यामुळे अनेक ठिकाणी उत्सव साजरा होणार आहे. मात्र उत्सवाची संपूर्ण तयारी झाली तरीही ध्वनिक्षेपक मिळत नसल्याने दहीहंडी आयोजकांना घाम फुटला आहे.
दहीहंडी आयोजनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डीजे लावून गोविंदा व प्रेक्षकांच्या मनोरंजनाची सोय केली जात असते. यंदाही अनेक दहीहंडी आयोजकांनी विविध कार्यक्रम आखला. मात्र सर्व काही ठरल्याप्रमाणे निश्चित झालेले असताना नकार मिळत आहे तो फक्त साऊंड व्यावसायिकांकडून.
ध्वनिक्षेपकाविना कार्यक्रम करायचा कसा असा प्रश्न दहीहंडी आयोजकांना पडला आहे. अनेक दहीहंडी आयोजकांनी प्रतिवर्षीचा भाड्याच्या डीजेवर होणारा खर्चाचा अंदाज काढून संपूर्ण सेट स्वत:च विकत घेतलेला आहे. अशा आयोजकांची मात्र या त्रासातून सुटका झाली आहे.
दहीहंडीची संपूर्ण तयारी झाली असली तरीही अनेक आयोजकांना साऊंड सिस्टीम मिळालेली नाही. राज्यव्यापी संपाचे कारण सांगून साऊंड व्यावसायिकांकडून आयोजकांची अडवणूक केली जात आहेत. यामुळे डीजेच्या संपाचा फटका दहीहंडी उत्सवाला बसणार असून, गोविंदांचे थर रचत असताना डीजे वाजेल की नाही याबाबत साशंकता आहे.
- वैभव नाईक,
अध्यक्ष,
वन वैभव कला क्रीडा निकेतन