ग्रामीण भागातील बस थांब्यांची दुरवस्था, साफसफाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 04:11 AM2017-08-27T04:11:33+5:302017-08-27T04:12:04+5:30
तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी बस थांब्यांची सध्या दुरवस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बस थांब्याचा उपयोग प्रवाशांना बसण्यासाठी न होता, दुचाकी, फेरीवाले, भिकारी यांनी त्यांची जागा घेतली आहे.
पनवेल : तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी बस थांब्यांची सध्या दुरवस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बस थांब्याचा उपयोग प्रवाशांना बसण्यासाठी न होता, दुचाकी, फेरीवाले, भिकारी यांनी त्यांची जागा घेतली आहे. त्यामुळे बस थांब्यांची साफसफाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
पनवेल तालुक्यातील शेकडो गावांमध्ये बस थांबे बांधण्यात आले आहेत. सुकापूर, चिपळे, नेरे येथील बस थांब्यांची अवस्था बिकट झाली आहे. सुकापूर येथील बस थांब्यामध्ये दुचाकी पार्किंग करून ठेवत आहेत. तर काही बस थांब्यांमध्ये मद्यपी व भिकारी थांबलेले दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच प्रवासी वाहनाची वाट पाहत उभे राहावे लागते. बस थांब्यांच्या स्वच्छतेकडे व साफसफाईकडे लक्ष न दिल्यामुळे हे बस थांबे दुर्लक्षित होत आहेत. चिपळे येथील बसथांब्यात कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. नेरे येथील बस थांबा दगड, सिमेंटच्या पत्र्याच्या तुकड्यांनी भरलेला आहे. गॅरेजचालकांनी दुरुस्तीसाठी आणलेल्या दुचाकी बस थांब्यांमध्ये सुरक्षित ठेवल्याचे निदर्शनास येत आहे. नेरे येथील बस थांबा एकीकडे आणि बस थांबतात दुसरीकडे. त्यामुळे प्रवासी या बस थांब्याकडे फिरकतदेखील नाहीत.