पनवेलमधील ग्रामीण भाग समस्यांच्या गर्तेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 07:07 AM2018-01-06T07:07:27+5:302018-01-06T07:07:37+5:30
पनवेल महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. पाणीपुरवठा व मलनि:सारण समितीचे सभापती नीलेश बाविस्कर यांनी नुकताच पालेखुर्द गावाचा पाहणी दौरा केला.
- वैभव गायकर
पनवेल : - पनवेल महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. पाणीपुरवठा व मलनि:सारण समितीचे सभापती नीलेश बाविस्कर यांनी नुकताच पालेखुर्द गावाचा पाहणी दौरा केला. गावातील समस्यांची माहिती प्रशासनाला वारंवार दिली तरी योग्य उपाययोजना करण्यात येत नसल्याचे यावेळी बाविस्कर यांनी सांगितले.
महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २९ गावांच्या विकासाकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे जवळपास सर्वच नगरसेवकांकडून सांगण्यात येत आहे. गावांमध्ये पिण्याचे पाणी, पथदिवे, कचरा विल्हेवाट यासारख्या प्राथमिक सुविधांचा अभाव जाणवतो.
पालेखुर्द गावात सांडपाणी निचरा होण्याबाबत कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. गावातील गटारांचे पाणी एकत्र येऊन त्याचे डबक्यात रूपांतर झाले आहे. परिणामी परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने विविध आजार बळावत आहेत. गावातील पाणीपुरवठा अनियमित आहे. विशेष म्हणजे गावठाणाचा आराखडा अद्याप तयार करण्यात आला नसल्याने गावातील समस्या सोडविण्यात अडचणी येत आहेत. याआधी ग्रामपंचायतीमार्फत नियमित नालेसफाई तसेच गटारे, रस्ते दुरु स्तीची कामे केली जात असत, मात्र पालिकेच्या स्थापनेपासून विकासकामांना खीळ बसली आहे. सिडको हद्दीतील गावठाणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतच बरी होती, असे म्हणण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर आली आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील ग्रामीण भागातील विकासकामे रखडली आहे. पालिका प्रशासनाचा उदासीन कारभार या गोष्टीला कारणीभूत आहे. पनवेल महापालिका हागणदारीमुक्त असल्याचे केवळ कागदावर आहे. ग्रामीण भागात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- नीलेश बाविस्कर,
सभापती, पाणीपुरवठा,
मलनि:सारण समिती, पनवेल
सत्ताधारी भाजपा आणि आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या वादाचा परिणाम विकासकामांवर होत असलयाची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासन व सत्ताधाºयांनी एकत्र बसून विकासकामांचा अजेंडा तयार करणे गरजेचे असताना पनवेल महानगर पालिकेत हा विरोधाभास दिसून येत आहे.