ग्रामीण भागासही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 11:54 PM2019-10-12T23:54:33+5:302019-10-12T23:55:02+5:30

एफएसआयचा प्रश्न मार्गी । मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय

Rural areas will also be brought into the mainstream of development : Prashant thakur | ग्रामीण भागासही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार

ग्रामीण भागासही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार

Next

पनवेल : पनवेलसारख्या विस्तृत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासावर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न आहे. शहरी भागाच्या तुलनेने ग्रामीण भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करीत असून याकरिताच पनवेल महापालिकेची स्थापना करण्यात आली. पहिल्या टप्प्यात चार गावांना स्मार्ट करण्याचे धोरण पालिकेमार्फत आखण्यात आले आहे. याच धर्तीवर मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न असो, गरजेपोटी घरे, ‘नैना’ क्षेत्रातील विकासासाठी वैयक्तिक स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी दिली.


विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टर्ममध्ये कोणते प्रश्न घेऊन तुम्ही निवडणुकीत उतरणार आहात?
मी, सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. त्यांच्याच राजकीय इच्छाशक्तीमुळे पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण आखता आले. खारघर टोलप्रश्नावरून मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. तो टोलमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पालिकेची स्थापना गरजेची होती. त्याकरिता अनेक अडथळ्यांना सामोरे गेलो. मतदारसंघात विकासाच्या विविध योजना हाती घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत.


प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न?
वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांच्या प्रश्नावर लढा दिला आहे. प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलने छेडली आहेत. सिडकोने गरजेपोटी घरांच्या नियमितीकरणासाठी ठराव केला आहे. त्यापुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी २०१५ च्या पूर्वी सर्व अनधिकृत बांधकामांना दिलासा दिल्यामुळे त्याचा फायदा प्रकल्पग्रस्तांना होणार आहे. २०१५ पूर्वीची सरसकट सर्व बांधकामे नियमित होणार असल्याने प्रकल्पग्रस्तांना मोठा फायदा होणार आहे.


पाणीप्रश्न सोडविण्यासाठी काय उपाययोजना आखत आहात?
पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सिडकोचे अध्यक्षपद स्वीकारताच सर्वप्रथम हेटवणे, बाळगंगा धरणाची पाहणी केली. एमजेपीमार्फत पनवेल शहरातलगत बºयाच भागाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अनेक ठिकाणी एमजेपीच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. नव्याने जलवाहिनी टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पाणीगळती थांबेल आणि त्याचा उपयोग नागरिकांना होईल. याच धर्तीवर कोंढणे धरणासाठी सिडकोमार्फत सल्लागार नेमला आहे. चार ते पाच वर्षांत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या धरणाच्या पाण्याचा उपयोग पनवेल परिसराला होणार आहे.


तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाचा गंभीर विषय?
तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाच्या गंभीर विषयाबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. याबाबत एमपीसीबीने कडक पाऊल उचलणे गरजेचे आहे. हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा एमआयसीडीमध्ये बसविण्याची गरज आहे. तसे झाल्यास परीसरातील प्रदूषणाचा अंदाज येईल. प्रदूषण कमी करण्यासाठी संबंधित कारखान्यांना ठरावीक मुदत देण्याची गरज आहे. जेणेकरून कारखाने बंद पडून कामगार बेरोजगार होणार नाहीत, याबाबतही एक कालबद्ध कार्यक्रम आखून शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे.


तिसºया टर्ममध्ये आमदार झाल्यास मंत्रिपदाची अपेक्षा आहे का?
मला मंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा नाही. १०० पेक्षा जास्त आमदार ज्या पक्षात आहेत, त्यांना प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे. मात्र, हे शक्य नाही. आपल्या प्रभागातील प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. शासनस्तरावर ते सोडविले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारीदेखील मंत्र्यापेक्षा कमी नाही. माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी सिडको अध्यक्षपद हे मोठे पद आहे.

Web Title: Rural areas will also be brought into the mainstream of development : Prashant thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.