ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत; उमरोलीचा संपर्क पुन्हा तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:04 AM2019-08-05T00:04:37+5:302019-08-05T00:04:54+5:30

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल परिसरात हाहाकार माजवला आहे

Rural life disrupted; Umroli's contact is broken again | ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत; उमरोलीचा संपर्क पुन्हा तुटला

ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत; उमरोलीचा संपर्क पुन्हा तुटला

googlenewsNext

- मयुर तांबडे

पनवेल : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल परिसरात हाहाकार माजवला आहे. सगळीकडे पाणीच पाणी झालेले असून नागरिकाना २००५ च्या पूराची आठवण झाली आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत.
पाऊस विश्रांती घेत नसल्याने पनवेल शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला आहे. टपाल नाका, मुसलमान नाका, रोहिदास वाडा, महावितरण परिसर, कापड बाजार, पडघे, कोळवडी यासह ग्रामीण भागात कित्येक तास पुराचा वेढा होता.

शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. तालुक्यातील चिपळे येथील पूलाला पाणी लागायला काही ईंच पाण्याची गरज होती तर शांतिवन येथील पूलावरून आठवड्यात दोन वेळा पाणी गेल्याने हा पूल धोकादायक बनला असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेचा या पूलाला चिरा गेल्या असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहतूक करणारे प्रवासी यांच्या मनात धडकीच भरली आहे. पोलिसांनी व ग्रामस्थांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. पूलावरून पाणी गेल्याने डांबर निघून गेले आहे. पूलावरून वाहतुकीस बंदी आणल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. वाहने अलीकडेच थांबवून त्यांना चालत घर गाठावे लागले. याच पूलाशेजारील काही भाग खचला आहे. त्यामुळे याची डागडुजीकरणाची मागणी करण्यात येत आहे.

पनवेल व परिसरात पावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेलीच नाही. त्याचा फटका नागरिक व शेतकऱ्यांना बसत आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. सलग न थांबता कोसळत असलेल्या पावसामुळे सर्वाधिक संपर्क तुटण्याचा फटका यावर्षी तालुक्यातील उमरोली या गावाला बसला आहे. तब्बल २० हून अधिक वेळा या गावाचा संपर्क तुटल्याने त्यांना रविवारी देखील घरीच बसावे लागले.

उमरोली गावासाठी बांधण्यात येत असलेल्या नवीन पूलाला पावसाचे पाणी लागले होते. ग्रामीण भागातील काही रस्त्यांवर फुटभर पाणी साचलेले पाहावयास मिळाले. नेरे, हरिग्राम या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना काहींच्या वाहनांमध्ये पाणी गेल्याने वाहने बंद पडली. त्यांना ढकलत वाहने बाहेर काढावी लागली. गाढी नदीला महापूर आल्याने गाढी नदीचे पात्रही दुधडी भरून वाहत होते. पावसामुळे सकाळी कामावर जाणा?्या चाकरमान्यांचेही हाल झाले. मुसळधार पावसाने पनवेलला झोडपुन काढले आहे. अनेक बैठ्या घरात तसेच झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. त्यामुळे रहिवाशांना सामानाची हलवाहलवी करावी लागली. काहींच्या स्वयंपाक घरापर्यंत पाणी गेले होते. त्यामुळे येथील कुटुंबीयांची त्रेधातिरपिट उडाली. संसार भिजू नये यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. त्यामुळे पनवेलमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले. मध्येमध्ये पाऊस उसंत घेत असल्याने पाणी निचरत असले तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले.

Web Title: Rural life disrupted; Umroli's contact is broken again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.