नवी मुंबई : भरधाव डंपरने दहाहून अधिक वाहनांना धडक दिल्याची घटना वाशी टोलनाका येथे रविवारी दुपारी घडली. यामध्ये एका कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर डम्पर चालकाने पळ काढला असून पोलिसांनी त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
वाशी टोलनाक्यालगत रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबईकडून वाशीकडे जाणाऱ्या भरधाव डंपरच्या चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे हा डंपर दहा वाहनांना धडकला. त्यामध्ये बस, कार, दुचाकी अशा वाहनांचा समावेश आहे. त्यामध्ये एका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामधील दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर डंपर चालकाने तिथून पळ काढला असून प्रत्यक्षदर्शींनी त्याच्या सहकाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ब्रेक फेल झाल्याने डंपरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.