गव्हाणफाटा-चिर्ले हायवेवर भरधाव दुचाकीला कंटेनर ट्रेलर्सची धडक; एक ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 08:40 PM2024-03-30T20:40:56+5:302024-03-30T20:41:40+5:30
दुचाकीस्वार जागीच ठार: संतप्त ग्रामस्थ व नातेवाईकांच्या रास्तारोकोमुळे चार तासांपासून वाहतूक ठप्प: चार किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा
मधुकर ठाकूर
उरण : खांदा कॉलनीत आपल्या भाच्याच्या लग्नाच्या हळदीचे विधी करून माघारी परतणाऱ्या दुचाकीला कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत दुदैवाने मामा जागीच गतप्राण झाला आहे.शनिवारी दुपारी गव्हाणफाटा -चिर्ले दरम्यान हायवेवर घडलेल्या भीषण अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करुन जेएनपीए बंदराराकडे येजा करणारी वाहतूक रोखुनी धरली.ग्रामस्थांच्या या अनपेक्षित रास्तारोकोमुळे या मार्गावरील जेएनपीए बंदरातील वाहतूक तीन तासांपासून ठप्प झाली आहे.
मृताच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने परिस्थिती चिघळत चालली आहे. उरण तालुक्यातील मोठी जुई गावचे माजी उपसरपंच वसंत भोईर हे खांदा कॉलनीत राहणाऱ्या भाच्याला हळदीचा लग्नविधी उरकून दुचाकीवरून माघारी घराकडे निघाले होते.गव्हाणफाटा -चिर्ले शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान हायवेवर त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली.कंटेनरच्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत वसंत भोईर हे जागीच गतप्राण झाले.
अपघातानंतर वाहनचालक फरार झाला आहे.या अपघाताची बातमी पसरताच परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.संतप्त झालेल्या ग्रामस्थ व नातेवाईकांनी गव्हाणफाटा -चिर्ले महामार्गावरील वाहतूक रास्तारोको करून बंद पाडली.मृताच्या वारसांना आर्थिक नुकसान भरपाईचा निर्णय होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने या जेएनपीए मार्गावरील कंटेनर वाहतूक मागील तीन तास ठप्प झाली आहे.याप्रकरणी उरण पोलिस, प्रशासन, नातेवाईक यांच्यात चर्चा सुरू आहे.अद्यापही तोडगा निघाला नसल्याने या मार्गावर वाहतूकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आहे.दोन्ही बाजुंनी वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहनांच्या चार किमी अंतरापर्यंत रांगा लागल्या आहेत.