सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यात पेटलेल्या युद्धामुळे नवी मुंबईचे नऊ विद्यार्थी युक्रेनच्या खारकीव्ह शहरात अडकले आहेत. सध्या एका हॉस्टेलच्या तळघरात ते सुरक्षित असून, सुमारे १२०० किमी अंतरावर असलेल्या युक्रेनच्या सीमेपर्यंत त्यांना पोहोचायचे आहे. मात्र, बाहेर सुरू असलेला गोळीबार व बॉम्बहल्ल्यामुळे त्यांना बाहेर निघताही येत नसल्याने अन्नपाण्याचाही प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत असून, मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने दोन्ही देशाशी असलेल्या संबंधांचा वापर करण्याची मागणी होत आहे.
गेल्या पाच दिवसांपासून युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरू आहे. त्यामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले असून, नागरिक राहत्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यात सुमारे चार हजार भारतीयांच्या समावेशाची शक्यता आहे. त्यात नऊ विद्यार्थी नवी मुंबईचे असल्याचे समोर आले आहे. प्रथमा सावंत, संगम सॉ, हिमानी ठाकूर, दक्षा कानडे, लक्ष्मी विश्वकर्मा, सागरिका भाटकर, मिश्रित शर्मा, पूर्वा जायभे व आकांक्षा मल्लिक अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले आहेत. युद्ध पेटल्यानंतर त्यांना राहत्या हॉटेलच्याच तळघरात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यांना युक्रेनच्या सीमेपर्यंत सुरक्षित पोहोचविण्याचे प्रयत्न सैन्याकडून केले जात आहेत.
मात्र, लपलेल्या ठिकाणावरून बाहेर निघायचे तरी कसे, असा प्रश्नही त्यांना पडला आहे. अशाच प्रकारात खारकीव्ह येथील विद्यार्थ्यांना तुकड्या तुकड्यांनी शहराबाहेर हलवले जात असतानाच मंगळवारी झालेल्या गोळीबारात कोलकाता येथील एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वच विद्यार्थी दहशतीच्या सावटाखाली असल्याची चिंता नेरूळच्या दक्षा कानडे हिचे वडील प्रदीप कानडे यांनी व्यक्त केली आहे. दक्षासोबतच त्याठिकाणी सुमारे दोन हजार विद्यार्थी अडकले आहेत. त्यात काही जण भारतातील देखील आहेत. इमारतीबाहेर होणारा गोळीबार आणि स्फोटांच्या आवाजामुळे त्यांना सतत धडकी भरत आहे. अशातच अन्न व पाणीपुरवठा देखील अपुरा पडू लागला आहे, तर खारकीव्हमधून धावणाऱ्या रेल्वेत केवळ युक्रेनच्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जात असल्याने शहराबाहेर निघायचे तरी कसे, असाही प्रश्न पडला आहे.