सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : खारकीव्ह शहरात अडकलेले विद्यार्थी प्राण धोक्यात घालून खारकीव्ह रेल्वेस्थानक पर्यंत पोहोचले आहेत. मात्र, त्याठिकाणी भारतीयांसह इतरांची अडवणूक करून स्थानिकांना शहराबाहेर काढण्यात प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सात तासाहून अधिक वेळ तिथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांचा धोका अधिक वाढला असून त्यात नवी मुंबईच्याही विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे खारकीव्ह शहरात नवी मुंबईचे अनेक विद्यार्थी अडकून पडले आहेत. बुधवारी पहाटे त्यांना राहत्या हॉस्टेल मधून बाहेर निघून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी गोळीबार व मिसाईल हल्ले यातून स्वतःला वाचवत खारकीव्ह रेल्वेस्थानक गाठले आहे. त्याठिकाणावरून त्यांना हंगेरी बॉर्डरपर्यंत सोडले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, खारकीव्ह स्थानकात पोहोचून देखील त्यांना रेल्वेने प्रवासात अडवले जात असल्याचे तिथे अडकलेल्या दक्षा कानडे हिने पालकांना कळवले आहे. अशातच खारकीव स्थानकाच्या आवारात देखील गोळीबार व स्फोटाचे आवाज घुमू लागले आहेत. यामुळे वेळीच त्या विद्यार्थ्यांना त्याठिकाणावरून रेल्वेने हलवले न गेल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता तिचे पालक प्रदीप कानडी यांनी व्यक्त केली आहे.
भारत सरकारने पुढाकार घेऊन खारकीव्ह स्थानकात अडकलेल्या विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवासासाठी आवश्यक मदत करून त्यांना सुखरूप शहराबाहेर काढण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. मात्र, सात तासाहून अधिक वेळ सुमारे १२०० विद्यार्थी खारकीव्ह स्थानकात अडकून पडलेले असतानाही त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ठोस पाऊल उचलले जात नसल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे. परिणामी खारकीव्ह व लगतच्या शहरात अडकून पडलेल्या नवी मुंबईतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चिंतेत अधिकच भर पडत चालली आहे.
खारकीव्हमध्ये विद्यार्थ्यांच जीव धोक्यात
खारकीव्ह मध्ये अडकलेल्यांना तात्काळ शहर खाली करण्याचे सूचित करण्यात आले आहे. शहरावर मोठा हल्ला होण्याच्या शक्यतेवरून भारतीय दूतावासांकडून तशी सूचना करण्यात आली आहे. मात्र खारकीव्ह शहर सोडण्यासाठी विद्यार्थ्यांना बस किंवा रेल्वेत घेतले जात नाहीये. यामुळे स्वतःच्या सुरक्षेसाठी भारतीयांनी पायी चालत जाण्याचा अजब सल्ला देण्यात आला आहे. त्यासाठी तीन शहरे सुचवण्यात आली असून ती सर्व शहरे 10 ते 13 किमी लांब अंतरावरील आहेत. आज पहाटेपासून विद्यार्थी चालत खारकीव्ह स्थानक पर्यंत पोचले असताना, पुन्हा त्यांना जीव धोक्यात घालून चालत सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सुचवले जात आहे.