Sabhajiraje : संभाजीराजे समर्थकांची नवी मुंबईत बॅनरबाजी; छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 11:55 AM2022-06-12T11:55:23+5:302022-06-12T11:56:23+5:30
खासदारकीच्या उमेदवारीवरुन शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात चांगलेच मतभेद झाले आहेत.
मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे इच्छुक होते. त्यासाठी, सर्वपक्षीय आमदारांकडे त्यांनी मतदान करण्याची मागणीही केली होती. त्यात, शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील बोलणी फिस्कटली. त्यामुळे, निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप त्यांनी केला होता. आता, राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्याने शिवसेनेवर संभाजीराजे समर्थकांकडून टिका करण्यात येत आहे.
खासदारकीच्या उमेदवारीवरुन शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात चांगलेच मतभेद झाले आहेत. त्यातच, राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेनं दिलेला 6 वा उमेदवार पराभूत झाल्यानंतर संभाजीराजेंनी ट्विट करुन शिवसेनेला लक्ष्य केलं. त्यांनी कुठेही शिवसेनेचा उल्लेख केला नाही. मात्र, शिवसेनेला टोला लगावला. तर, आता नवी मुंबईत संभाजीराजेंच्या समर्थनार्थ बॅनर झळकले आहेत.
बॅनरच्या माध्यमातून शिवसेना व मुख्यमंत्र्यांना टोला लगावण्यात आला आहे. "शिवरायांच्या गनिमीकावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार", असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच, "आज पुन्हा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा". राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे 2024 बाकी है, अशा आशयाचे बॅनर मुंबईत चर्चेचा विषय ठरत आहेत.
खासदार संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेनं कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनाच राज्यसभेची उमेदवारी दिली. महाविकास आघाडीकडे संख्याबळ जास्त असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, देवेंद्र फडणवीसांची रणनिती यशस्वी ठरली. अपक्ष आणि लहान पक्षांतील आमदारांना आपलंसं करण्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळे, 6 व्या जागेवर शिवसेना उमेदवार पराभूत झाला. भाजपचे धनंजय महाडिक खासदार झाले.
संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला
माजी खासदार संभाजीराजेंनी ट्विट करुन शिवसेनेला टोला लगावला.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll
संभाजीराजेंच्या या ट्विटचा अर्थ अनेकांना जाणून घ्यायचा आहे. तुकोबांच्या अभंगातील या ओवी असून 'वाघाची कातडी ओढून वाघ होता येत नाही', असा मतीत अर्थ या ट्विटचा आहे.
वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. !
तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते. !!
असा या तुकोबांच्या अभंगातील ओवींचा अर्थ आहे.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 11, 2022
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll
दरम्यान, तत्पूर्वी एक दिवस अगोदरही संभाजीराजेंनी ट्विट केलं होतं. ''कोल्हापुरच्या दोन पैलवानांची कुस्ती रंगतदार सुरू आहे. मला आनंद आहे कोल्हापुरचाच खासदार होणार.'', असे त्यांनी ट्विटमधून म्हटले होते.
रायगडावरुनही साधला होता निणाशा
शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून संभाजीराजेंनी सूचक विधान करत शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. शिवाजी महाराजांविरोधात अनेक बादशाही उभ्या होत्या. कुतुबशाही, आदिलशाही, मुघलशाही यांना सुद्धा लक्षात आले शिवाजी महाराज काहीतरी वेगळे रुप आहेत. शिवाजी महाराजांना अडवायला हवं. मग काय करायला हवं? त्यांनी ठरवलं बाप-लेकात भांडणं लावायची. शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्यात भांडणं लावली आणि शहाजीराजेंवर दबाव आणला. शिवाजी महाराजही म्हणाले माझ्या वडिलांवर एवढा दबाव आहे. स्वराज्य स्थापन करत असताना घराण्यात फूट पाडायची हा इतिहास जुना आहे, असे म्हणत त्यांनी नाव ने घेता शिवसेनेला लक्ष्य केलं होतं.