नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी बोनकोडे गावात छापा टाकून २० लिटर गावठी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी ८ जणांना अटक केली असून त्यामध्ये दारू विक्री करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.बोनकोडे गाव येथे काही ठिकाणी गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोपरखैरणे पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी रात्री संबंधित ठिकाणी धडक कारवाई केली. मुंबईच्या मालवणी दुर्घटनेनंतर सर्वच ठिकाणची अवैध दारूविक्री बंद करण्यात आली आहे. त्यानंतरही बोनकोडे गावात छुप्या पद्धतीने दारूची विक्री सुरूच होती. याची माहिती पोलिसांना मिळताच त्याठिकाणच्या दोन अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत दारूविक्री करणाऱ्या महिला व ग्राहक अशा ८ जणांना अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. गुलाबबाई नाईक (३८), नितीन पाटील (१८) अशी दारूविक्री करणाऱ्यांची नावे आहेत. तर ग्राहकांमध्ये भीमराव वरखडे, सूरज पाटील, दिना मडके, राजू विटकर, मलक कोळी, अर्जुन घाडगे, रामसिंह सिंग यांचा समावेश आहे. त्यांच्यावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विक्रीसाठी दारू कुठून आणली जायची याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)
बोनकोडे गावातून गावठी दारू जप्त
By admin | Published: August 24, 2015 2:41 AM