नवी मुंबई : कोपरखैरणे येथील नगरसेवक शिवराम परशुराम पाटील आणि नगरसेविका अनिता शिवराम पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी नऊ लाख रुपयांचा निधी संकलित केला. या निधीतून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त दहा गावांतील सुमारे तीन हजार महिलांना साडीवाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पूरग्रस्त महिलांना ही मदत मिळाल्याने ग्रामस्थांनी नगरसेवक दाम्पत्य व त्यांच्या प्रभागातील रहिवाशांचे आभार मानले आहे.अस्मानी संकटामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेकडो गावे जलमय झाली. हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र धावून आला. मुंबईसह नवी मुंबई व ठाणे शहरातून मदतीचा ओघ सुरू झाला. तांदूळ, तेल, साबण, पाण्याच्या बाटली आदी साहित्यांसह विविध प्रकारची मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यात आली.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक शिवराम पाटील व नगरसेविका अनिता पाटील यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. रहिवाशांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल नऊ लाख रुपयांचा निधी गोळा केला. या निधीतून साडी, चोळी आणि परकर असे तीन हजार संच खरेदी करण्यात आले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जवळपास दहा पूरग्रस्त गावांतील महिलांना ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घरोघरी जाऊन त्याचे वाटप करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी आणि नेळेवाडी गावात अनुक्रमे १८०० व ७०० साड्यांचे वाटप करण्यात आले. तर सातारा जिल्ह्यातील टेबेवाडी, तळवे, महिंद, सनबूर, रवळे व उंदावणे या गावांतील ७०० पूरग्रस्त महिलांना साडी, चोळी व परकरचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक शिवराम पाटील यांच्यासह माजी नगरसेवक विद्यानंद माने, विजय पराडकर, दिलीप ढवळे, संतोष मोरे, अनिव पाटील, शरद शिंदे, अॅड. शफिक खान, मोरेश्वर आगास्कर, उत्तम पहारे, गणेश कोळी, संदीप पाटील व हृषीकेश पाटील आदी उपस्थित होते.