लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेलजवळील माची प्रबळ गडावर ट्रेकिंगसाठी गेलेले तिघे जण अंधारात भरकटल्याने, त्यांना स्थानिक आदिवासी व ग्रामस्थांच्या मदतीने पनवेल तालुका पोलिसांनी सुखरूप खाली आणलेमुंबई येथील नयन नंदकुमार सिन्हा (२७, रा. अंधेरी), अविनाश कुमार (२५, रा. ठाणे), त्याची बहीण दिव्याकुमारी (२६, रा. ऐरोली), या तिघा जणांनी पनवेल तालुक्यातील वाजे गावाजवळच्या माची प्रबळ गडावर ट्रेकिंगसाठी सोमवारी दुपारी सुरुवात केली. मजल-दरमजल करीत ते गडावर ट्रेकिंग करत होते; परंतु सायंकाळी काळोख वाढत होता, तर दुसरीकडे मुसळधार पावसाने जोर धरल्याने भरकटत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या वेळी त्यांनी त्यांच्या मोबाइलवरून नवी मुंबई पोलीस कंट्रोलशी संपर्क साधला व आपण गडावर वाट चुकल्याचे सांगितले. तत्काळ कंट्रोलने पनवेल तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शालीग्राम, पोलीस नाईक संदेश म्हात्रे, सरोदे, कोळसे या पथकाने तत्काळ स्थानिक ग्रामस्थ व आदिवासी बांधवांशी संपर्क साधला. त्यानुसार तीन पथके तयार करून रात्री भरपावसात तिघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. डोंगर पालथा घातल्यानंतर एका घनदाट झाळीजवळ हे तिघे उभे असलेले पोलिसांना दिसले. या पथकाने त्यांना सुखरूप खाली उतरवले. साधारण दीड ते दोन तास ही पथके त्यांचा शोध घेत होती व अखेरीस त्यांना यश आले. माची प्रबळमध्ये मोठ्या प्रमाणात जंगली श्वापदे फिरत असतात, तसेच लुटमारीचीसुद्धा शक्यता नाकारता येत नव्हती. अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडलेल्या असल्याने पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या पथकांनी विशेष खबरदारी घेत, या तिघांची सुखरूप सुटका केल्याबद्दल त्यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व आदिवासी बांधवांचे कौतुक होत आहे.
भरकटलेल्या ट्रेकर्सची सुखरूप सुटका
By admin | Published: June 28, 2017 3:29 AM