घरोघरी तपासणी करणाऱ्या कोरोनादूतांची सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:29 PM2020-09-27T23:29:29+5:302020-09-27T23:29:53+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : लागण होण्याची भीती
नवी मुंबई : राज्य शासनाच्या सूचनेनुसार ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेस नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही सुरुवात करण्यात आली आहे. घरोघरी तपासणी करण्यासाठी जाणारे कोरोनादूत थेट कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात येत असून, त्यांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, या कर्मचाऱ्यांना पीपीई किटसारखी सुरक्षा साधने उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्यभर राबविली जात आहे. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातूनही या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता ७२० पथके तयार करण्यात आली आहेत. एका पथकात २ ते ३ कोरोनादूत घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांचे शारीरिक तापमान व आॅक्सिजन सॅच्युरेशन मोजत आहेत. त्याचप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य स्थितीची माहिती शासनाने दिलेल्या अॅपवर नोंदणी करून घेत आहेत. १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर अशा मोहिमेच्या पहिला टप्प्यास सुरुवात झाली आहे. तपासणीदरम्यान अनेक संशयित रुग्ण आढळून येत असून, पुढील तपासणीसाठी कार्यवाही केली जात आहे. महापालिकेच्या माध्यमातून गेल्या काही आठवड्यांपासून नागरी आरोग्य केंद्रांमध्ये मास्कचा पुरवठा अल्प प्रमाणात होत आहे. त्यामुळे नागरी आरोग्य केंद्रात काम करणारे अधिकारी आणि कर्मचाºयांना मास्कचा तुटवडा भासत आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची साधने महापालिकेच्या माध्यमातून पुरविली जात नसल्याने, या करोनादूतांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
तपासणीसाठी ७२० जणांचे पथक तयार केले आहेत. त्यानुसार २ ते ३ कोरोनादूत घरोघरी जाऊन लोकांच्या चाचण्या घेत आहेत. पण त्यांच्याकडं योग्य सुरक्षा साधने नसल्याचे दिसते आहे.