- वैभव गायकर
पनवेल : शहरात महापालिकेच्या मालकीच्या दोन व्यापारी संकुलांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ एकाच सुरक्षारक्षकावर आहे. या संकुलात दुकाने, बँका, विविध कार्यालये आहेत. याशिवाय महापालिकेच्या प्रभाग ‘ड’ विभागाचे कार्यालयही आहे. फेरीवाल्यांनीही या ठिकाणी बस्तान मांडले असून, संकुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पनवेल शहरातील दोन वाणिज्य संकुलात नागरिकांची कायम मोठी वर्दळ असते. या ठिकाणी वकील, बांधकाम व्यावसायिक, वृत्तपत्राचे कार्यालय, दुकाने, बँकांची कार्यालये स्थित आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख असणे गरजेचे आहे. मात्र, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाही. शिवाय केवळ एकच सुरक्षारक्षक नियुक्त असल्याने चोरी, मारामारी सारख्या घटना या ठिकाणी पूर्वी घडल्या आहेत.
विशेष म्हणजे, पालिकेचे ‘ड’ विभागाचे प्रभाग कार्यालय नुकतेच या ठिकाणी सुरू करण्यात आल्याने नागरिकांची ये-जा या ठिकाणी वाढली आहे. शहरातील वाहतूककोंडीची समस्याही जटील आहे. व्यापारी संकुलाजवळ पनवेल महापालिकेच्या मालकीची एकमेव पार्किंग आहे. मात्र, त्या पार्किंगमध्ये गाड्यांपेक्षा माणसांचा भरणा जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाºया नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरात असलेल्या फेरीवाल्यांनी पार्किंगचा ताबा घेतल्याचे दिसून येत आहे.
दोन संकुलांपैकी विलासराव देशमुख व्यापारी संकुलात लवकरच एलआयसी कार्यालय, पोस्ट कार्यालय सुरू होणार आहे. त्या कार्यालयांचे महत्त्व लक्षात घेता, या ठिकाणी सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शंभरहून जास्त गाळे असलेल्या या व्यापारी संकुलांत स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत आहे.
या ठिकाणी रात्री गर्दुल्ले, मद्यपींचा वावर असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे महापालिकेने संकुलाच्या सुरक्षेचा विचार गांभीर्याने घेण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून तसेच व्यापाºयांकडून करण्यात येत आहे.व्यापारी संकुलात समस्यांचे ग्रहणपूर्वाश्रमीच्या नगरपरिषदेने उभारलेल्या व्यापारी संकुलात विविध समस्यांचे ग्रहण लागले आहे. अस्वच्छ परिसर, फेरीवाल्यांचे अतिक्र मण, स्वच्छतागृहांची दुरवस्था आदी समस्या या ठिकाणी नित्याच्या आहेत. पालिकेमार्फत विशेष मोहीम राबवून कारवाईची आवश्यकता आहे.पनवेलमधील व्यापारी संकुलातील समस्या जाणून घेण्यात येणार आहे. सुरक्षाव्यवस्थेबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे. याशिवाय स्वच्छतेबाबतही कारवाई करण्यात येणार आहे.- श्रीराम हजारे,प्रभाग अधिकारी,‘ड’ प्रभाग समिती, पनवेल महापालिका