नवी मुंबई - एनएमएमटी प्रशासनाने घणसोली डेपो महालक्ष्मी ट्रान्सपोर्टला चालविण्यासाठी दिला आहे. परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नादुरुस्त बसेस रोडवर चालविल्या जात आहेत. बसेस रोडवर बंद पडण्याच्या घटना वाढू लागल्या असून चालू बसचा टायर निघाल्याची घटनाही घडली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला प्रत्येक किलोमीटरला १९ रुपये तोटा होऊ लागला होता. तोटा भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. याचाच भाग म्हणून घणसोली डेपो महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आला. डेपोमधील बस दुरुस्ती, बसची साफसफाई करण्याची जबाबदारी ठेकेदारावर सोपविण्यात आली. सुरवातीच्या काळात ठेकेदाराने चांगले काम केले. परंतु मागील काही महिन्यांपासून निष्काळजीपणामध्ये वाढ होऊ लागली आहे. गत आठवड्यामध्ये उरण परिसरामध्ये चालू बसचा टायर निखळला. बसमधील प्रवासी जखमी झाले नाहीत. देखभाल दुरुस्तीचे काम योग्यप्रकारे केले जात नसल्यानेच अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. यापूर्वीही एका बसचा टायर निखळल्याची घटना घडली होती. गुरूवारी नेरूळमधील समाधान हॉटेलसमोर बस बंद पडली. घणसोली डेपो ठेकेदाराला चालविण्यासाठी दिल्यानंतर त्यांना नवीन बसेस पुरविण्यात आल्या होत्या. परंतु योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे बसेस बंद पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. बसेस वेळापत्रकाप्रमाणे धावत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. बसेसच्या साफसफाईकडेही दुर्लक्ष केले जात आहे. घणसोली आगाराच्या देखभालीकडेही योग्य लक्ष दिले जात नाही. डेपोमध्ये येणाºया-जाणाºया नागरिकांची नोंद ठेवली जात नाही. गुरूवारी बस धुलाईचे काम बंद झाले होते. अनेक वेळा बसेस वेळेवर धुतल्या जात नसल्याच्या तक्रारी प्रवासीही करू लागले आहेत. डेपोमध्ये डिझेल भरण्यासाठी पंप आहे, पण अनेक वेळा डिझेल संपल्यामुळे बसेस रोडमध्ये बंद पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. ठेकेदाराकडे पुरेसे चालक नसल्यामुळे उपक्रमाकडील वाहकांकडून बसेस चालविल्या जात होत्या. घणसोली आगारामध्ये बस दुरूस्तीची जबाबदारीही ठेकेदाराची आहे. डेपोत जाऊन पाहणी केली असता दुरूस्तीचे काम करणाºया कर्मचाºयांकडे गणवेश, सेफ्टी बूट नसल्याचे निदर्शनास आले. एनएमएमटीच्या कर्मचाºयांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कार्यशाळेमध्ये ठेकेदाराने एकाही अभियंत्याची देखभालीसाठी नियुक्ती केलेली नाही. एनएमएमटीचा अभियंता देखभालीसाठी ठेवण्यात आला आहे. प्रशासनाचे नियंत्रण राहिले नसल्याचा आरोपही होऊ लागला आहे.ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. बस बंद पडणे, चालू बसचा टायर निघणे अशा गंभीर चुका होवू लागल्या आहेत. बसची अस्वच्छता, मार्गावर बसचे डिझेल संपण्याच्या घटनाही घडल्या असून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी केली आहे.- समीर बागवान,परिवहन सदस्यदंडात्मक कारवाईचा बडगाघणसोली डेपोतील ठेकेदाराविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, नियमाप्रमाणे कामकाज होत आहे का याकडे लक्ष दिले जाते. अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चालू बसचा टायर निघाला, प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 3:20 AM