सुरक्षा व्यवस्थेची निद्रावस्था, गृहनिर्माण सोसायट्यांसह व्यापारी संकुलांची सुरक्षा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 03:08 AM2017-11-07T03:08:01+5:302017-11-07T03:08:06+5:30
दरोडा, चोरी व घरफोडीच्या घटना होवू नये यासाठी एटीएम, गृहनिर्माण सोसायट्या व व्यापारी संकुलांबाहेर २४ तास सुरक्षा रक्षक तैनात केले जातात.
नामदेव मोरे
नवी मुंबई : दरोडा, चोरी व घरफोडीच्या घटना होवू नये यासाठी एटीएम, गृहनिर्माण सोसायट्या व व्यापारी संकुलांबाहेर २४ तास सुरक्षा रक्षक तैनात केले जातात. सुरक्षेची जबाबदारी असलेले हे कर्मचारीच बिनधास्तपणे झोपा काढत असल्याचे चित्र शहरामध्ये पाहावयास मिळत आहे. सुरक्षेविषयीचा हा निष्काळजीपणा चोरट्यांच्या पथ्यावर पडू लागला असून, बिनधास्तपणे दिवसाही दरोड्याच्या घटना होवू लागल्या आहेत.
वाशी सेक्टर १७ मधील कुसुम गृहनिर्माण सोसायटीमध्ये २७ आॅक्टोबरला दरोडा पडला. शहरातील श्रीमंतांची वसाहत, प्रत्येक सोसायटीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था, स्वतंत्र पोलीस चौकी व २४ तास गजबजलेल्या परिसरामध्ये दिवसा साडेअकरा वाजता सहा जण सशस्त्र दरोडा टाकून तब्बल २ कोटी ९ लाख रुपयांचा ऐवज चोरून निघून जातात. या घटनेमुळे पनवेल, नवी मुंबई परिसरामध्ये खळबळ उडाली व शहरातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शहरातील प्रत्येक घर व दुकानांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस घेवू शकत नाहीत. यामुळेच सोसायटींमध्ये, ज्वेलर्स, बँका, एटीएम व इतर सर्व व्यापारी संकुलामध्ये स्वतंत्र सुरक्षा रक्षक ठेवले जातात. सुरक्षेची जबाबदारी या रक्षकांची असली तरी सद्यस्थितीमध्ये ९० टक्के सुरक्षा रक्षक मध्यरात्री निद्रावस्थेमध्ये असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही सुरक्षा रक्षक सुरक्षेऐवजी वाहने धुण्यापासून इतर कामेच करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खासगी कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षकांकडे स्वागतकक्षाची व टेलिफोन आॅपरेटरची जबाबदारी देण्यात येत आहे. नोंदणीकृत कंपनीऐवजी बोगस कंपनीकडून सुरक्षा रक्षक नियुक्त केले जातात. सुरक्षा रक्षकांना २४ तासांची ड्युटी दिली जाते. यामुळे अनेक सुरक्षा रक्षक खुर्चीवर बसून झोपा काढत असल्याचे पाहावयास मिळते.
सुरक्षा रक्षकांविषयी पोलीस, सुरक्षा रक्षक एजन्सी, गृहनिर्माण सोसायट्या व नागरिक सर्वच उदासीन असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सुरक्षा रक्षकाचे नक्की काम काय आहे याचीही माहिती अनेकांना नाही. सुरक्षा रक्षकांना आवश्यक प्रशिक्षणही दिले जात नाही. सुरक्षेबरोबर कमी पगार असला तरी परप्रांतीय ही नोकरी स्वीकारतात. कारण मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था व पोटापाण्याचा प्रश्न सुटतो. सुरक्षा रक्षक कंपन्यांनाही चोवीस तास काम करण्याची तयारी असणारा कर्मचारी हवा असतो. शिवाय कमी पगारात काम केले पाहिजे ही अपेक्षा असते. यामुळेच सुरक्षा व्यवस्थाच निद्रावस्थेमध्ये गेली आहे. फक्त नावापुरते सुरक्षा रक्षक उभे केले जात असून मध्यरात्र झाली की ते आडवे होवून घोरत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये स्पष्ट झाले आहे.
सुरक्षा रक्षकांचे आरोग्य धोक्यात
शहरातील अनेक सुरक्षा रक्षकांना १२ ते २४ तास ड्युटी करावी लागत आहे. अनेक ठिकाणी सलग ४८ तासही काही कर्मचारी काम करत असतात. न झोपता दिवस-रात्र काम करणाºया सुरक्षा रक्षकांच्या आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. सुरक्षा रक्षकही माणूस आहे याचाच विसर सर्व यंत्रणेला पडू लागला असून अतिश्रमामुळे अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे.
ठोस उपाययोजनांची गरज
पोलीस प्रशासनाने शहरातील सुरक्षा व्यवस्थेमधील गलथानपणा थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
सुरक्षा रक्षक पुरविणाºया कंपन्यांची, गृहनिर्माण सोसायट्या, व्यापारी संकुल व बँक प्रतिनिधींच्या बैठका घ्याव्या.
सुरक्षा व्यवस्थेमधील त्रुटी सुधारण्यासाठी सर्वांना विश्वासात घेवून प्रयत्न करावे व त्यानंतरही सुरक्षा रक्षक कंपन्या व सुरक्षा रक्षकांच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली नाही तर कडक कारवाई करावी करण्याची मागणी होत आहे.
स्टिंग आॅपरेशनमधील वास्तव
वाशीतील दरोडा प्रकरणानंतर ‘लोकमत’ने शहरातील गृहनिर्माण सोसायट्या बँका, ज्वेलर्स दुकान, एटीएम सेंटरची पाहणी केली. ९० टक्के ठिकाणी सुरक्षा रक्षक झोपले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. अनेकांना जागे करून विचारणा केली असता २४ तास ड्युटी असते यामुळे रात्री थोडा वेळ झोपावेच लागते अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
सर्व यंत्रणाच दोषी
झोपा काढणाºया सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नास सर्व यंत्रणाच दोषी आहे. पोलीस विनापरवाना सुरक्षा एजन्सी चालविणाºयांवर कडक कारवाई करत नाही. गृहनिर्माण सोसायट्या व व्यापारी आस्थापनांना कमी पैशामध्ये सुरक्षा रक्षक हवे असतात. सुरक्षा रक्षक कंपन्यांनाही कमी पैशात २४ तास काम करणारे रक्षक हवे असतात. कमी पगार व २४ तास ड्युटी दिल्यानंतर सुरक्षा रक्षक चांगल्याप्रकारे कर्तव्य कसे बजावणार असा प्रश्न सुरक्षा रक्षकांनीच ‘लोकमत’कडे उपस्थित केला आहे.