विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात, स्कूलबसचालकांकडून नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:36 AM2019-01-20T00:36:57+5:302019-01-20T00:37:17+5:30
स्कूलबस चालकांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वैभव गायकर
पनवेल : तालुक्यात स्कूलबस चालकांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून अनेक कडक नियमावली करण्यात आली आहे ; परंतु ती केवळ कागदोपत्री असून, त्यांचे काटेकोर पालन करण्यास स्कूलबस आॅपरेटर व राज्य सरकारही उदासीन आहे.
स्कूलबसच्या तुलनेत व्हॅन-रिक्षाचे भाडे कमी असल्याने व्हॅन-रिक्षाला पसंती देतात. मात्र, यामुळे पालकवर्ग मुलांच्या सुरक्षेशी तडजोड करत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्याशिवाय स्कूलबस फी ठरवणे, मुलांकडून फी जमा करणे आणि स्कूलबस आॅपरेटरला ती देणे, हेही काम शाळा प्रशासनाने करणे अनिवार्य आहे. त्यासाठी शाळा आणि स्कूलबस आॅपरेटर्समध्ये ‘कॉमन स्टँडर्ड अॅग्रिमेंट’ करणे बंधनकारक आहे. सध्या या कराराला बगल देऊन स्कूलबस चालवण्यात येतात. खांदेश्वरमधील एका बसमध्ये खिडक्यांजवळ जाळी नसल्याने विद्यार्थी खिडकीतून बाहेरच्या दिशेने सर्रास झोकावताना दिसून आले. व्हॅनमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ केला जातो.
>चालकांसाठी नियमावली
आयएसआय मार्क असलेली ‘ए’, ‘बी’, ‘सी’ प्रकारची अग्निशमन उपकरणे चालकाच्या कक्षामध्ये (कॅबिन) ठेवलेली असावीत.
वाहनाच्या पुढील, मागील बाजूस स्कूलबस असा उल्लेख असावा.
बसमध्ये चढण्यासाठी पायरीच्या वरच्या कडेची जमिनीपासूनची उंची ३०० मिलीमीटर पेक्षा जास्त नसावी.
बसच्या दोन्ही बाजूस बहिर्वक्र भिंगाचे आरसे अनिवार्य आहेत.
बसमध्ये खिडकीच्या कडेला आपत्कालीन दरवाजा असणे गरजेचे आहे.
सीसीटीव्ही कार्यान्वित असणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांची निगा राखण्यासाठी शाळेतील कर्मचारी बसमध्ये उपलब्ध असणे गरजेचे आहे.
खिडक्यांना लोखंडी जाळी असणे गरजेचे आहे.
सुसज्ज प्रथमोपचार पेटी बसमध्ये असणे अनिवार्य आहे.
खारघर, कळंबोली, कामोठे, खांदेश्वर, नवीन पनवेल, पनवेल आदीसह पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या ३५० पेक्षा जास्त आहे.
नियमानुसार, स्कूलबस मुलांच्या सुरक्षेसंदर्भात असलेल्या सर्व नियमांचे पालन करतात की नाही, हे पाहणे शाळा प्रशासनाचे काम आहे.
पनवेलमध्ये १३०० च्या आसपास स्कूलबसेस दररोज रस्त्यावर धावत आहेत. मात्र, नियमांची माहिती असून चालक ते पाळण्यास चालढकल करीत असल्याचे दिसून येत आहे.
मुलांना शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे गाडीत कोंबण्यात येते. मुलांना एकमेकांच्या मांडीवर बसून प्रसंगी उभे राहून प्रवास करावा लागतो.