- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईशहरातील विरंगुळ्याचं महत्त्वाचं केंद्र असलेल्या वाशीतील भावे नाट्यगृहाची सुरक्षा सध्या रामभरोसे आहे. विद्युत विभागाच्या हलगर्जीमुळे त्या ठिकाणचे १६ पैकी अवघे तीन कॅमेरे सुरू आहेत. बंद असलेले हे कॅमेरे दुरुस्त करण्यासंदर्भात भावे प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करूनही विद्युत विभागाने त्यास गांभीर्याने घेतलेले नाही.वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृह हे शहरातील विरंगुळ्याचे मुख्य केंद्र आहे. राजकीय सभांसह शाळांचे कार्यक्रम तसेच विविध नाटकांचे प्रयोगदेखील त्या ठिकाणी होतात. यामुळे त्या ठिकाणी प्रतिदिन नागरिकांची मोठ्या संख्येने ये-जा सुरूच असते. सिडकोकालीन हे नाट्यगृह सध्या महापालिकेच्या ताब्यात आहे. यानुसार तिथली सर्वस्वी देखभाल महापालिकेतर्फे केली जाते. मात्र पालिकेच्या विद्युत विभागाकडून भावेच्या सुरक्षेत हलगर्जीपणा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे वर्षभरापासून त्या ठिकाणचे १३ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून अवघे तीनच कॅमेरे सुरू आहेत. ही बाब गांभीर्याची असल्याने बंद स्थितीत असलेले कॅमेरे सुरू करण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांनी विद्युत विभागाकडे केलेली आहे. यानंतरही त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेला नाही.२००८ मध्ये याच भावे नाट्यगृहात दोन जिवंत बॉम्ब सापडले होते. सदर बॉम्बची माहिती वेळीच मिळाल्याने पोलिसांनी ते निकामी करून संभाव्य मोठी दुर्घटना टाळली होती. यानंतर भावेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय सन २००९ च्या स्थायी समितीमध्ये झाला होता. यानुसार भेट स्वरूपात दिलेले १६ सीसीटीव्ही भावेतल्या हालचालींवर नजर ठेवून होते. मात्र देखभाल व दुरुस्तीअभावी त्यापैकी १३ कॅमेरे मागील वर्षभरापासून बंद आहेत. तर चालू स्थितीत असलेले तीन कॅमेरे साधे असल्याने त्याचे चित्रीकरणही तपासाकरिता उपयुक्त ठरत नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असले तरी विद्युत विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन आहे.भेट स्वरूपात मिळालेल्या सीसीटीव्हींची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने सध्या ते बंद स्थितीत आहेत. शिवाय सुरू असलेले तीन कॅमेरेदेखील जुने असल्याने आवश्यक तितके उपयुक्त ठरत नाहीत. यामुळे भावे नाट्यगृहाच्या सुरक्षेत अद्ययावतता आणण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु मराठी नाटकांचा अथवा नाट्यरसिकांचा तिरस्कार असल्यानेच तिथल्या सुरक्षेत जाणीवपूर्वक हलगर्जीपणा होत असल्याचाही आरोप प्रेक्षकवर्गाकडून होत आहे.यापूर्वी भावे नाट्यगृहात दहशतवादी कारवाईचा प्रयत्न झालेला असतानादेखील तिथल्या सुरक्षेत होत असलेल्या हलगर्जीपणाबाबत पालिकेला पत्र पाठवल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. मात्र पोलिसांच्या पत्रानंतरही पालिकेच्या विद्युत विभागाला याचे गांभीर्य कळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.सीसीटीव्हीची जबाबदारी कोणाची?नाट्यगृहातील सीसीटीव्ही तत्कालीन स्थायी समिती सभापतींच्या निर्णयानुसार विशेष निधीमधून बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सीसीटीव्हींची देखभाल व दुरुस्ती करायची कोणी, असा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवलेला आहे. हे कॅमेरे विद्युत विभागाने बसवलेले नसल्याने त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी आपली नसल्याचे विद्युत विभागाचे सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांनी सांगितले. यामुळेच नाट्यगृह प्रशासनाकडून पत्रावर पत्र पाठवूनदेखील त्याची दखल विद्युत विभागाने घेतलेली नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. अवघे तीन कॅमेरे सुरू : ऐरोली खाडीपूलमार्गे तीन संशयित व्यक्ती नवी मुंबईत आल्याची खबर एटीएसकडे प्राप्त असून, त्यांची रेखाचित्रे तयार करण्यात आलेली आहेत. त्याद्वारे संशयित दहशतवाद्यांचा शोध सुरू असतानाच त्यांच्याशी मिळत्याजुळत्या दोघांना भावेत पाहिल्याची तक्रार एका व्यक्तीने वाशी पोलिसांत केली. त्यामुळे पोलिसांनी भावे नाट्यगृहातले सीसीटीव्ही तपासले असता तिथले १६ पैकी अवघे तीन कॅमेरे सुरू असल्याची बाब उघड झाली.
वाशीतील भावे नाट्यगृहाची सुरक्षा वाऱ्यावर
By admin | Published: October 17, 2015 11:50 PM