उरणच्या गरीब मराठी मुलाचा अटकेपार झेंडा; नेदरलँडमध्ये शिक्षण घेऊन मिळवली डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 09:59 AM2023-12-18T09:59:28+5:302023-12-18T10:00:14+5:30
बुध्दीच्या जोरावर नेदरलँडमध्ये शिक्षण घेऊन मिळवली सागर आडतरावने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी
मधुकर ठाकूर
उरण : हार-गजरे विकणारी गरीब आई, रिक्षा चालणारे वडिल, सामाजिक संस्था व माजी सेना आमदार, हितचिंतकांकडून वेळोवेळी मिळालेली आर्थिक मदत आणि मेहनत, बुध्दीच्या जोरावर नेदरलँडमध्ये शिक्षण घेऊन उरणच्या सागर आडतराव या मराठी मुलाने नुकतीच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी संपादन केली आहे.गरीबीवर मात करून त्यांनी मिळविलेल्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
उरण शहरातील बोरी येथील होणेश्वर मंदिराजवळ हे मराठी आई-वडिल दोन मुली आणि एक मुलगा असे पाच जणांचे आडतराव कुटुंब मागील ५० वर्षांपासून वास्तव्यास होते.वडिल सुरेश हे रिक्षा चालक तर आई हार-फुलांचे गजरे विकून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होती.दोन्ही बहिणींची लग्न झाली आहेत.दोन नंबरचा सागर बुध्दीने पहिल्या पासूनच हुशार. दहावी आणि बारावीमध्ये उरण तालुक्यात सागर हा प्रथम आल्यानंतर सर्वानाच त्याच्या हुशारीची चुणूक अनुभवास आली. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करताना मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान त्याने मिळविला होता.
पुढे एमई (ME) चेन्नई येथे पूर्ण करून तो पीएचडी पूर्ण करण्यासाठी नेदरलँडला गेला होता. नुकतीच त्याने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी संपादन केली आहे.गरीब आई-वडीलांच्या मेहनतीमुळे तो या यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.मात्र दुदैवाने सात वर्षांपूर्वीच वडिलांचे पक्षाघाताच्या झटक्याने निधन झाले.त्यापाठोपाठ तीन वर्षांपूर्वी त्याची आई सुरेखा ही कोवीडची बळी ठरली. अशा कठीण परिस्थितीत उरण सामाजिक संस्थेचे संतोष पवार, माजी सेना आमदार मनोहर भोईर आणि इतर हितचिंतकांकडून वेळोवेळी मिळालेली आर्थिक मदत आणि सागर यांनी घेतलेली अपार मेहनत, बुध्दीच्या जोरावर नेदरलँडमध्ये शिक्षण घेऊन उरणच्या एका गरीब घरातील सागर आडतराव या एका मराठी मुलाने " डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी " ही पदवी मिळवली आहे.यशस्वीरित्या शिक्षण पूर्ण करून परदेशातून पीएचडी पूर्ण करणारा तो उरण तालुक्यातील पहिला मुलगा ठरला आहे.गरीबीवर मात करून त्यांनी मिळविलेल्या सागरच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.