अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात हेमंत नगराळे यांना सहआरोपी करा- आनंद बिद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 05:16 AM2017-12-29T05:16:19+5:302017-12-29T05:16:23+5:30
पनवेल : साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाला एक वेगळे वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी २८ डिसेंबर रोजी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
पनवेल : साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाला एक वेगळे वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांनी २८ डिसेंबर रोजी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात आम्ही सप्टेंबर २०१६ रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली होती. या भेटीत आम्हाला काहीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तसेच कोणतेही सहकार्य न करता उलट आम्हालाच भीती दाखविण्याचा प्रयत्न नगराळे यांनी केला. ‘या प्रकरणात तुमच्या जिवाला धोका आहे. तुम्ही सावध राहा,’ असे आयुक्तांनी आम्हाला सांगितले. पोलिसांकडे या प्रकरणात कुरुं दकर आरोपी असल्याबाबत आॅडिओ-व्हिडीओ उपलब्ध असतानाही या प्रकरणी पोलिसांनी कुरुंदकरविरोधी गुन्हा दाखल केला नव्हता. पोलीस सहकार्य करीत नसल्याने आॅक्टोबर २०१६ रोजी आम्ही न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात तपासाला गती दिली. त्यानंतर साहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड आणि पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांची या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर ३१ जानेवारी २०१७ रोजी अश्विनी बेपत्ता असल्याचा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
या प्रकरणात काहीच बाहेर येत नसल्याने आम्ही १६ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसार माध्यमांच्या समोर हा विषय मांडल्यानंतर तपासाला गती मिळाली. आम्ही ज्या वेळी पोलीस आयुक्तांना पुराव्याचे दाखले देत कुरुं दकर यांना अटक करण्याची मागणी केली, तेव्हा ते पुरावे सबळ नसल्याचे आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. मात्र, याच प्रकरणी जेव्हा आम्ही न्यायालयात धाव घेतली तेव्हा या पुराव्यांच्या आधारावर आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे आनंद बिद्रे यांनी सांगितले.
>तपास योग्य दिशेने सुरू
अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणाचा तपास अधिकारी मी नाही. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड करीत आहेत. पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनानुसार या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी वेळोवेळी या प्रकरणाच्या तपासाची माहिती उच्च न्यायालयाला दिली आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आम्ही डीएनए रिपोर्टची वाट पाहत आहोत, त्यानंतर या प्रकरणावर प्रकाश पडेल. हा विषय न्यायालयात असल्याने तपासातील भाग उघड करता येणार नाही, असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.