सायन - पनवेल महामार्गावर वाढली वाहतूककोंडी, वाहतूक पोलिसांची तारेवरची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 05:17 AM2017-08-25T05:17:56+5:302017-08-25T05:18:01+5:30
गणेशोत्सवासाठी कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जाणा-या वाहनांची संख्या वाढल्याने सायन - पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी झाली. वाशी, सानपाडासह अंतर्गत रोडवरील ताणही वाढला होता. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.
नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जाणा-या वाहनांची संख्या वाढल्याने सायन - पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी झाली. वाशी, सानपाडासह अंतर्गत रोडवरील ताणही वाढला होता. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.
सायन - पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले होते. सायंकाळपर्यंत वाहतूक सुरळीत होती. वाशी टोलनाक्यावर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी कोणत्याच वाहनांकडून टोल घेतला जात नव्हता. सायंकाळी सहानंतर सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली व कोकणाकडे जाणाºया वाहनांची संख्या प्रचंड वाढली. नेहमीपेक्षा चार ते पाच पट वाहने वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली. तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनजवळील शरयू हुंडाई मोटर्सपासून वाशीपर्यंत वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. ठाणे- बेलापूर रोडवरून येणारी वाहने व महामार्गावरून येणारी वाहने शरयू हुंडाईजवळ महामार्गावर एकत्र येत असल्याने तेथे वाहतूककोंडी होऊ लागली होती. एस. टी. महामंडळाने त्यांच्या बसेस मानखुर्द जकात नाक्याजवळ उभ्या केल्या होत्या. या बसेसविषयी माहिती नवी मुंबईमधील वाहतूक पोलिसांना दिली नाही. या सर्व बसेस रोडवर आल्याने मानखुर्द ते वाशी दरम्यान मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. वाशी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड व त्यांच्या सहकाºयांनी योग्य समन्वय ठेवून वाहतूक सुरळीत केली.
महामार्गावर झालेल्या वाहतूककोंडीमुळे अनेकांनी पामबीच रोडवरून व सानपाडा, नेरूळच्या अंतर्गत रोडवरून सीबीडीकडे जाण्यास सुरवात केली. यामुळे अंतर्गत रोडवरही वाहतूककोंडी झाली होती. पनवेल एस. टी. स्टँडच्या बाहेर नानासाहेब धर्माधिकारी पुलाखालीही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. ही कोंडी फोडताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
खासगी बसेस चालकांची बेशिस्त
महामार्गावर खासगी बसेस व इतर खासगी वाहनांच्या बेशिस्तपणामुळेही वाहतुकीवर परिणाम होऊ लागला होता. वाशी ते पनवेलदरम्यान एस. टी. च्या बसथांब्यावर खासगी बसेस थांबविल्या जात होत्या. महामार्गावर मध्येच वाहने उभी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला होता.
पोलिसांची दिवस-रात्र मेहनत
गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी महामार्गावर जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पहाटे कर्तव्यावर आलेल्या वाहतूक पोलिसांना रात्री १२ नंतरही काम करावे लागले होते. रात्रपाळीलाही जादा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली होती.
एस. टी. बसेसमुळे कोंडी
गणेशोत्सवासाठी एस. टी. महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केली होती. या बसेस महामार्गावर वाशी, सानपाडा, नेरूळ, सीबीडी, खारघर, कामोठे व कळंबोलीमध्ये महामार्गावरच उभ्या केल्या जात होत्या. याशिवाय मानखुर्द जकात नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात एस. टी. बसेस उभ्या करण्यात आल्या व रात्री एकाच वेळी अनेक बसेस सोडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली होती.