नवी मुंबई : हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी सहा महिने सुट्टीवर असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सफाई कामगाराची ठेकेदाराने हजेरी दाखवून सुट्टीवर असलेल्या सर्व महिन्यांचे पूर्ण वेतन महापालिकेकडून घेतले असल्याचा आरोप समाज समता कामगार संघाचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी केला आहे. महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याने आयुक्तांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लाड यांनी केली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागांत सुमारे ६९८१ कंत्राटी कामगार काम करत आहेत. या कामगारांना सुविधा देताना ठेकेदार अन्याय आणि फसवणूक करत असल्याचा आरोप लाड यांनी केला आहे. नेरुळ येथे काम करणारा महापालिकेचा सफाई कामगार सुधीर टिळक यांची १२ नोव्हेंबर २०२० रोजी हृदयाची शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी ते सप्टेंबर २०२० पासून फेब्रुवारी २०२१ असे सहा महिने सुट्टीवर होते. हा कामगार राज्य कामगार विमा योजनेप्रमाणे गैरहजर कालावधीतील वेतन मिळण्यासाठी कार्यवाही करत होता; परंतु वेतन लाभ मिळण्यासाठी राज्य कामगार विमा योजनेच्या अर्जावर ठेकेदाराची स्वाक्षरी आवश्यक होती.
ठेकेदाराने सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कामगार सुट्टीवर असताना हजर असल्याचे दाखवून महापालिकेकडून पूर्ण वेतन घेतल्याचा आरोप लाड यांनी केला आहे. त्यामुळे ठेकेदार टिळक यांच्या राज्य कामगार विमा योजनेच्या फॉर्मवर टाळाटाळ करत असल्याचे लाड यांनी सांगितले. ठेकेदाराने महापालिकेची फसवणूक केली असून, ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. तसेच ठेकेदाराने कामगाराचे घेतलेले वेतन कामगारास देण्यात यावे, अशी मागणी लाड यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
ठेकेदाराने कामगाराचे घेतलेले वेतन कामगारास देण्यात यावे, अशी मागणी लाड यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.