3600 टन सुक्या मेव्याची विक्री; दहा दिवसांत १३५ कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:13 AM2020-11-13T00:13:45+5:302020-11-13T00:13:53+5:30
दिवाळीमध्ये गोड मिठाईऐवजी सुका मेवा, खजूर, खारीक यांना जास्त पसंती दिली जात आहे.
- नामदेव मोरे,
नवी मुंबई : नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाल्यामुळे दिवाळीसाठी मिठाईपेक्षा सुका मेव्याला पसंती दिली जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा दिवसांमध्ये तब्बल ३६०० टन सुका मेव्याची विक्री झाली असून तब्बल २२०० टन साखरेची आवक झाली आहे. खारीक व खजूरच्या विक्रीमध्येही वाढ झाली आहे. मुंबई व नवी मुंबईकरांमध्ये मागील काही वर्षांपासून आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे.
दिवाळीमध्ये गोड मिठाईऐवजी सुका मेवा, खजूर, खारीक यांना जास्त पसंती दिली जात आहे. जगभरातून सुका मेवा विक्रीसाठी मुंबईमध्ये येत असतो. पूर्वी संपूर्ण राज्यात व गुजरातमध्येही मुंबईमधून सुका मेवा पाठविला जात होता. परंतु शासनाने नियमनमुक्ती केल्यामुळे परस्पर मुंबई व इतर ठिकाणी माल जाण्यास सुरुवात झाली असून बाजार समितीमधील उलाढालीवर परिणाम झाला आहे. बाजार समितीची मक्तेदारी संपुष्ठात आली असली तरी अद्याप अनेक जण खरेदीसाठी एपीएमसीच्या मसाला मार्केटला पसंती देत आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दहा दिवसांमध्ये तब्बल ३६०० टन सुका मेव्याची विक्री झाली आहे. सर्वाधिक १४१६ टन बदामची विक्री झाली आहे. खारीक, खजूर, आक्रोड, पिस्ता व काजूलाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.बाजार समितीमध्ये दोन महिन्यांपासून सुका मेवाचे बाजारभाव स्थिर आहेत. दहा दिवसांमध्ये सुका मेव्याच्या विक्रीतून जवळपास १३५ कोटींची उलाढाल झाली आहे. एपीएमसीच्या बाहेरही कित्येक कोटी रुपयांची उलाढाल या व्यवसायातून झाली आहे.
काॅर्पोरेट कंपन्या, व्यवसायिक, राजकीय पदाधिकारी दिवाळीनिमित्त भेट देताना गोड मिठाईऐवजी सुका मेव्याला पसंती देत आहेत. आकर्षक पद्धतीने सुका मेव्याचे पॅकिंग करून त्याची विक्री केली जात आहे. दिवाळीमध्ये साखरेचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. साखरेवर नियमन नसल्यामुळे बाजार समितीच्या बाहेर परस्परही मोठ्या प्रमाणात साखरेची विक्री होत असते. बाजार समितीमध्ये दहा
दिवसांत २२०० टन साखरेची विक्री झाली आहे. कोठून येतो सुका मेवा?
मुंबईमध्ये बदाम अमेरिका, ऑस्ट्रेलिया व इतर देशांमधून विक्रीसाठी येत असतो. काजू देशाच्या विविध राज्यांतून येतो व विदेशातूनही आयात होत आहे. खजूर, खारीक सौदी अरेबिया व आखाती देशांमधून येत आहे. कॅलिफोर्नियातून आक्रोड, पिस्ता मुंबईमध्ये विक्रीसाठी येत आहे.