खाद्यपदार्थातील किरणोत्साराच्या बनावट प्रमाणपत्रांची विक्री, तोतया वैज्ञानिकाविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 01:44 PM2022-02-08T13:44:56+5:302022-02-08T13:45:42+5:30
भारतामध्ये तयार केले जाणारे खाद्यपदार्थ देशाबाहेर विक्री करायचे असल्यास त्यासाठी खाद्य पदार्थांमधील अणु किरणोत्सार तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. ही तपासणी बीआरआयटी या शासनाच्या संस्थेमार्फत केली जाते.
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : निर्यात केल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांमधील अणु किरणोत्सार तपासणीच्या अधिकाऱ्याची बनावट प्रमाणपत्रे विक्री केल्याप्रकरणी तोतया वैज्ञानिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तोतया वैज्ञानिकाने स्वतः बीएआरसीमधील सह वैज्ञानिक असल्याचे भासवून दोन खासगी कंपन्यांना हे अधिकार प्रमाणपत्र विकले आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बीआरआयटीच्या तक्रारीवरून एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतामध्ये तयार केले जाणारे खाद्यपदार्थ देशाबाहेर विक्री करायचे असल्यास त्यासाठी खाद्य पदार्थांमधील अणु किरणोत्सार तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. ही तपासणी बीआरआयटी या शासनाच्या संस्थेमार्फत केली जाते. या तपासणीत संबंधित खाद्यपदार्थ निर्यात योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच संबंधित कंपनी त्यांचे उत्पादन देशाबाहेर विक्री करू शकते. या चाचणीचे संपूर्ण अधिकार बीआरआयटी या शासनाच्या संस्थेकडेच आहेत. त्यानंतरही अणु किरणोत्सार चाचणीचे अधिकार खासगी कंपनीला देखील मिळतात असे भासवून तोतया वैज्ञानिकाने दोन कंपन्यांना बनावट अधिकार प्रमाणपत्राची विक्री केली आहे. यासाठी त्याने प्रमाणपत्रावर बीएआरसीच्या मोहोरचादेखील वापर केला आहे. तर या प्रकारातून त्याने दोन कंपन्यांना सुमारे १० लाख ६० हजारांचा गंडा घातला आहे.
वाय. जी. शेखर असे तोतया वैज्ञानिकाचे नाव आहे. त्याने स्वतःला बीएआरसीमधील सहायक वैज्ञानिक असल्याचे सांगून हा प्रकार केला आहे. परमाणू ऊर्जा विभागाने व बीएआरसीने त्याला या कामासाठी नियुक्त केल्याचे सांगून तो तसे पत्रदेखील दाखवत होता. ही बाब केंद्र सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बीआरआयटीला त्याबाबत कळवले होते. त्यानुसार या संस्थेने चौकशी केली असता, संबंधित प्रकार उघड झाला. त्यानुसार बीआरआयटीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोतया वैज्ञानिकाने तमिळनाडू येथील दोन कंपन्यांना संपर्क साधून फसवणूक केली आहे. यासाठी त्याने स्वतः मुंबईत बीएआरसीमध्ये वैज्ञानिक असल्याचे बनावट ओळखपत्र वापरून, परमाणू ऊर्जा विभागाने त्याची नियुक्ती केल्याचे बनावट लेटरहेडद्वारे भासविले. या प्रकरणाबाबत अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाला कळविले होते. त्यामुळे झालेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला आहे.
यामुळे त्या तोतया वैज्ञानिकाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना फसवणूक झालेल्या दोन कंपन्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागणार आहे. या प्रकरणावरून नवी मुंबईत तोतया वैज्ञानिकांमार्फत फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वी देखील ऐरोली येथील एका तरुणीला तोतया वैज्ञानिकाने लग्नाचे आमिष दाखवून फसविल्याची घटना घडली आहे.
बीआरआयटीच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तोतया वैज्ञानिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने बीएआरसी व परमाणू ऊर्जा विभाग यांचे बनावट शिक्के वापरून फसवणूक केली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याला कंपनीच्या संबंधितांव्यतिरिक्त इतर कोणी पाहिलेलं नाही. त्यामुळे त्याची ओळख पटवण्यासाठी फसवणूक झालेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढील तपासाला दिशा मिळणार आहे.
- नितीन सांगळे, पोलीस उपनिरीक्षक, एपीएमसी पोलीस ठाणे.