बाजारात जुन्याच राख्यांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:58 PM2020-07-29T23:58:02+5:302020-07-29T23:58:07+5:30
लॉकडाऊनमुळे उत्पादन ठप्प : घाऊक बाजारपेठेत खरेदीकडे महिलांची पाठ
अनंत पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : रक्षाबंधनचा सण तोंडावर आला आहे, परंतु कोरोनामुळे राख्या खरेदीसाठी बाजारात दरवर्षीप्रमाणे लगबग दिसत नाही. लॉकडाऊनमुळे राख्यांचे उत्पादनही होऊ शकलेले नाही. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी गेल्या वर्षीच्या शिल्लक राहिलेल्या राख्याच विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचे दिसून आले आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी राखीचे स्टॉल्स सुरू करण्याचे अधिकृत आदेश आलेले नाहीत. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये काही दुकानदारांनी गेल्या वर्षीच्या जुन्या राख्या विक्रीस ठेवलेल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये नवीन राख्यांचे (उत्पादन) होऊ शकलेले नाही. त्यामुळे नवीन माल बाहेर आलेला नसल्याचे येथील दुकानदारांनी सांगितले. घाऊक बाजारात राख्यांचे नवीन प्रकार आलेले नाहीत. जुन्याच राख्या विक्रीसाठी ठेवल्याने महिलांचाही हिरमोड झाल्याचे पाहावयास मिळते. नोकरी व्यवसायानिमित्त देश-परदेशात स्थायिक झालेल्या भावा- बहिणीसाठी टपाल खाते (पोस्ट कार्यालय) राखीपोच करण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावते. पार्सल आणि कुरियरच्या माध्यमातूनही राख्या पाठविल्या जातात. परंतु या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोस्टाने किंवा कुरियरने राख्या पाठविण्याच्या कामालाही फारशी गती नसल्याचे दिसून आले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे काही बहिणाबार्इंनी राखीऐवजी कोरोनापासून सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने राखीऐवजी आपल्या भावाला टोपी आणि तोंडाला मास बांधण्याचे आवाहन केले आहे. तशा आशयाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या अभिनव संकल्पनेचे कौतुक होताना दिसत आहे.
च्तळा : भाऊ-बहिणीचे नाते घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन होय. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला प्रेमाने राखी बांधून आपलं रक्षण करण्याचं वचन मागते व भाऊही तेवढ्याच निष्ठेने आपल्या बहिणीला रक्षण करण्याचं वचन देतो. असा हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने, तळा बाजारपेठेत विविध रंगांच्या राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.
च्५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत, तसेच त्यापेक्षाही जास्त किमतीच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, यंदा जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राख्यांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. भाऊ लांब राहत असल्याने, अनेक बहिणी आपल्या राख्या चार दिवस आधीच खरेदी करून पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवतात.
च्कोरोनामुळे कोठेही बाहेर जाता येत नसल्यामुळे, याचा परिणाम राख्यांच्या विक्रीवर झाला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रंगीबेरंगी कार्टून, डोरेमन, क्रिश, छोटा भीम या कार्टून असलेल्या, तर मोठ्यांसाठी गोंडा, रुद्राक्ष, हिरेजडित अशा अनेक आकर्षक राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, राख्यांच्या मागणीत घट झाल्याचे विक्रेते उल्हास तळकर यांनी सांगितले.