कायदा धाब्यावर बसवून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 01:54 AM2019-05-31T01:54:23+5:302019-05-31T01:55:04+5:30

कारवाईसाठी अपुरी यंत्रणा : गुजरातवरून होतो गुटख्याचा पुरवठा

The sale of tobacco products by the law enforcement staff | कायदा धाब्यावर बसवून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री

कायदा धाब्यावर बसवून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : पनवेलसह नवी मुंबई परिसरामध्ये गुजरातवरून रोज दोन टन गुटखा विक्रीसाठी येऊ लागला आहे. बंदी असूनही शहरातील ९० टक्के पानटपरीवर गुटख्याची बिनधास्तपणे विक्री होत आहे. कारवाईसाठी अपुरी यंत्रणा असल्याचा गैरफायदा माफिया घेऊ लागले आहेत. प्रत्येक हॉटेलबाहेर अनधिकृतपणे पानटपरी सुरू करण्यात आली असून, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरू असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.

शासनाने गुटखाबंदी व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु हे दोन्हीही निर्णय नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये धाब्यावर बसविले जात आहेत. एपीएमसी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी गुटखा विक्रेत्याकडून लाच घेताना अटक झाल्यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये रोज २०० किलो गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती येथील जाणकार देऊ लागले आहेत. दोन्ही महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये रोज किमान दोन टन गुटखा विक्री होत आहे. शासनाने बंदी केल्यामुळे पाच रुपये किमतीचा गुटखा १५ रुपयाला एक पुडी या दराने विकला जात आहे. आरएमडी गुटख्याची एक पुडी ५० रुपयांना विकली जात आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्यामुळे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी गुटख्याची तस्करी सुरू केली आहे. राज्यात बंदी असल्यामुळे गुजरातमधून गुटखा राज्यात आणला जात आहे. या ठिकाणी प्रत्येक विभागामधील पानटपऱ्यांना गुटखा पुरविणारे होलसेल विक्रेते तयार झाले आहेत. यामधील अनेक विक्रेत्यांनी स्वत:च पानटपºयाही सुरू करण्यास सुरुवात केली आहे. बाजार समितीमध्ये एका माफियाने २० पानटपऱ्या भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे; परंतु शहरातील बहुतांश सर्व हॉटेलच्या प्रवेशद्वारावर अनधिकृतपणे पानटपºया सुरू केल्या आहेत. नागरिकांची नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी पानटपऱ्या सुरू केल्या असून, रोडवरच सिगारेटचा धूर काढत अनेक जण उभे असतात. सिगारेटच्या धुराचा त्रास पादचाऱ्यांना होऊ लागला आहे; परंतु कारवाई करायची कोणी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचा फक्त एक निरीक्षक नवी मुंबईवर लक्ष ठेवण्याचे काम करत आहे. सदर अधिकारीही ठाणे कार्यालयामध्ये बसत आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळेच गुटखा विक्रीचे रॅकेट वाढत आहे. पोलीस प्रशासनाकडूनही ठोस कारवाई होत नाही, यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

शाळेसमोर पानटपरी
नेरुळ गावामधील महानगरपालिकेच्या शाळेच्या समोर पानटपरी सुरू करण्यात आली आहे. शाळेपासून १०० मीटर अंतरावर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास मनाई आहे. परंतु याठिकाणी काही फुटाच्या अंतरावरच बिनधास्तपणे विक्री होऊनही अद्याप एकदाही कारवाई झाली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागरिकांनीही कुठेही मोठ्या प्रमाणात साठा केल्याचे आढळल्यास १८००२२२३६५ या हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

पाच जिल्ह्यात ८ कोटींचा माल जप्त
गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाकडे आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीमध्ये १७५ ठिकाणी जप्तीची कारवाई केली आहे. ३१ गुन्हे दाखल केले असून तब्बल ८ कोटी ८० लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. ज्या वाहनांमधून या मालाची वाहतूक केली त्यांचा व्यवसाय परवाना व वाहन चालकाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओ विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

Web Title: The sale of tobacco products by the law enforcement staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस