नवी मुंबई : कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरलेले हातमोजे धुऊन पुन्हा विक्री करणाऱ्या टोळीचे राज्यभर तसेच राज्याबाहेर जाळे पसरले असल्याचे उघड झाले आहे. नवी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी भिवंडी येथे घोळगाव परिसरात छापा मारून सुमारे १२ टन जुने हातमोजे जप्त केले आहेत. ही टोळी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासह मध्य प्रदेश, केरळ व पंजाबमध्ये हे हातमोजे पुरवत असल्याचेही समोर आले आहे. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष १ चे वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम, सहायक निरीक्षक राहुल राख यांच्या पथकाने पावणे येथे छापा टाकल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले. त्यामध्ये सध्या अटकेत असलेल्या प्रशांत सुर्वे यांच्याकडून भिवंडी येथील गोडाऊनची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी त्या ठिकाणी छापा मारून गोडाऊन सील केले आहे. तेथून राज्यात सर्वत्र जुने हातमोजे नवे भासवून विक्रीसाठी पाठवले जात होते. त्यामुळे या रॅकेटमध्ये इतरही बड्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यांनी हातमोज्यांसह वापरलेले पीपीई किटदेखील अशाच प्रकारे धुऊन पुन्हा विक्री केली असण्याची शक्यता आहे. वेगवेगळी रुग्णालये, तसेच इतर वैद्यकीय संस्थांना नवे हातमोजे पुरवण्याऐवजी ही टोळी जुने हातमोजे पुरवत होती. याकरिता जिल्हानिहाय दलाल नेमले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.>कामगारांनाही नव्हती कल्पनाविविध ठिकाणच्या कोविड सेंटरमधून ते वापरलेले हातमोजे मिळवत होते. ते जमा करून वॉशिंग मशीनमध्ये धुऊन पुन्हा विक्री केले जात होते. याकरिता प्रशांतला भिवंडी येथून जुने हातमोजे पुरवले जायचे. ते धुऊन पुन्हा नव्या बॉक्समध्ये भरण्यासाठी त्याने पावणे येथील गामी इंडस्ट्रियल पार्कमध्ये दोन गाळे भाड्याने घेतले होते. त्यानंतर ‘साइन फॉर सेफ्टी’ कंपनीच्या नावाखाली जुने हातमोजे धुऊन नव्या बॉक्समध्ये पॅकिंग केले जायचे. असे चार टन हातमोजे कारवाई वेळी जप्त करण्यात आले होते. जुने हातमोजे धुऊन पॅकिंग करण्यासाठी कामावर ठेवलेल्या कामगारांनादेखील त्याची कल्पना नव्हती.
वापरलेल्या वैद्यकीय हातमोज्यांची राज्यात विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 2:41 AM