सिडकोकडून अतिक्रमणमुक्त १३ भूखंडांची विक्री, ३२३ कोटींची तिजोरीत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 07:02 AM2018-02-01T07:02:50+5:302018-02-01T07:03:03+5:30
सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांच्या विक्रीचा धडाका लावला आहे. शहराच्या विविध भागात अतिक्रमणमुक्त झालेल्या १३ भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत ३२३ कोटी रुपयांची भर पडली आहे. येत्या काळात ही मोहीम अधिक गतिमान करण्याचा निर्णय अतिक्रमण विभागाचे मुख्य नियंत्रक शिवराज पाटील यांनी घेतला आहे.
नवी मुंबई : सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांच्या विक्रीचा धडाका लावला आहे. शहराच्या विविध भागात अतिक्रमणमुक्त झालेल्या १३ भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत ३२३ कोटी रुपयांची भर पडली आहे. येत्या काळात ही मोहीम अधिक गतिमान करण्याचा निर्णय अतिक्रमण विभागाचे मुख्य नियंत्रक शिवराज पाटील यांनी घेतला आहे.
सिडकोची मालकी असलेल्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटविण्याची वेळोवेळी कारवाई केली जाते; परंतु कारवाईनंतर मोकळ्या झालेल्या भूखंडांच्या संरक्षणाच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे या भूखंडांवर पुन्हा अतिक्रमण उभारले जाते. मागील दोन वर्षांत सिडकोच्या संबंधित विभागाने नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रासह पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, तळोजा आदी भागांत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली आहेत; परंतु अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, अभियांत्रिकी आणि योजना विभागात परस्पर समन्वय नसल्याने अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांवर पुन्हा बेकायदा बांधकाम उभारले जात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडांची तातडीने विक्री करण्याचे निर्देश सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. तसे विशेष अधिकारही या विभागाला प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अतिक्रमणमुक्त झालेल्या १३ भूखंडांची निविदा काढून विक्री केली आहे. यात कोपरखैरणे (६), घणसोली (३), नेरुळ (१) आणि नवीन पनवेल येथील ३ भूखंडांचा समावेश आहे. या भूखंडविक्रीतून सिडकोला ३२३ कोटींचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या पणन विभागाचे सहायक विकास अधिकारी गणेश झिने यांनी दिली. या भूखंडविक्रीसाठी १० ते २५ जानेवारी या कालावधीत निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याला तब्बल १५७ निविदाधारकांनी प्रतिसाद दिला.
३० जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या निविदा उघडण्यात आल्या. काही महिन्यांपूर्वी या विभागाने पनवेल विभागातील अतिक्रमणमुक्त केलेल्या सहा भूखंडांची विक्री केली होती. त्यातून सिडकोला २२५ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता.
नेत्रदीपक कामगिरी
सध्या सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडे अत्यंत कमी कर्मचारी वर्ग आहे. त्या तुलनेत क्षेत्र मोठे आहे. उत्तर आणि दक्षिण नवी मुंबई या दोन्ही क्षेत्रांत या विभागाला अतिक्रमण निर्मूलनाचे काम करावे लागते. हे काम अत्यंत जिकिरीचे व तितकेच त्रासाचे आहे. असे असले तरी दोन वर्षांत या विभागाने नेत्रदीपक कामगिरी करीत, भूमाफियांचे कंबरडे मोडले आहे.
मार्केटिंगसाठी विशेष टीम
अनधिकृत बांधकाम विभागाने मागील दीड-दोन वर्षांत जवळपास ९० एकर जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे. मोकळ्या झालेल्या या भूखंडांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यादृष्टीने पुरेपूर उपाययोजना आखल्या जात आहेत. तसेच टप्प्याटप्प्याने निविदा काढून या भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे. त्यासाठी अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्केटिंगची विशेष टीम तयार करण्यात आली आहे. यात विकास अधिकारी (पणन) पी.बी.राजपूत, सहायक लेखा अधिकारी बी. आर. तांडेल, सहायक विकास अधिकारी गणेश झिने, श्वेता वाडेकर व क्षेत्र अधिकारी सुनील चिडचाडे आदींचा समावेश आहे.