एपीएमसीत भाजीपाला फळांची विक्रमी आवक, ग्राहकांची पाठ, २५० ट्रक भाजीपाला शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 03:21 AM2020-03-21T03:21:00+5:302020-03-21T03:21:20+5:30
कोरोनाचा परिणाम मुंबई बाजार समितीच्या व्यवहारावरही होऊ लागला आहे. गुरुवारी स्वच्छतेसाठी भाजी व फळ मार्केट बंद करण्यात आले होते.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी विक्रमी ८४३ ट्रक व टेम्पोंमधून आवक झाली आहे. परंतु ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे संपूर्ण मालाची विक्री होऊ शकली नाही. जवळपास २५० ट्रक माल विक्रीविना पडून होता. मुंबई, नवी मुंबईमधील फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद असल्याचा परिणामही विक्रीवर झाला आहे.
कोरोनाचा परिणाम मुंबई बाजार समितीच्या व्यवहारावरही होऊ लागला आहे. गुरुवारी स्वच्छतेसाठी भाजी व फळ मार्केट बंद करण्यात आले होते. यामुळे शुक्रवारसाठी व्यापाऱ्यांनीही जादा माल मागविला होता. राज्यातील अनेक मार्केटमध्ये व्यवहार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनीही मुंबईमध्ये माल विक्रीसाठी पाठविला होता. पहाटेपर्यंत तब्बल ८४३ ट्रक व टेम्पोंमधून भाजीपाला विक्रीसाठी आला. परंतु ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला. मुंबई व नवी मुंबईमधील फेरीवाल्यांवर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळेही किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाला खरेदीच केला नाही. जवळपास २५० ट्रक मालाची विक्रीच झाली नाही. विक्री न झालेल्या मालाची शनिवारी विक्री केली जाणार आहे. शिल्लक माल ग्राहकांनी घेतला नाही तर शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्राहक कमी असल्यामुळे काही वस्तूंचे दर कमी झाले आहेत.
कांदा, फळे, धान्य व मसाला मार्केटमध्येही दिवसभर चांगली आवक झाली होती. परंतु येथेही ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत होते. पाच मार्केटमध्ये सायंकाळी चार वाजेपर्यंत २२११ ट्रक व टेम्पोंची आवक झाली व ७६२ वाहनांमधून माल मुंबई व नवी मुंबईमधील किरकोळ मंडईमध्ये पाठविण्यात आला.
देशभरातून आला माल
मुंबई बाजार समितीमध्ये पुणे, नाशिक, सातारासह दक्षिणेकडील राज्ये, गुजरात परिसरातून भाजीपाल्याची आवक होत आहे. देशभरातून फळे विक्रीसाठी येत आहेत. अचानक मालाची जास्त आवक वाढल्यामुळे मार्केटमध्ये सकाळी वाहतूककोंडीही झाली होती.
गुरुवारी भाजीपाला मार्केट बंद असल्यामुळे शुक्रवारी आवक वाढली आहे. मोठ्या प्रमाणात आवक वाढली व ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे जवळपास २५० ट्रक भाजीपाल्याची विक्री झालेली नाही. पुढील आठवड्यात तीन दिवस मार्केट बंद राहणार असल्यामुळे शनिवारी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला लाभेल.
- शंकर पिंगळे,
संचालक, भाजीपाला मार्केट
तीन दिवस मार्केट बंद
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पुढील आठवड्यामध्ये तीन दिवस बंद राहणार आहे. २२ मार्चला रविवार असल्यामुळे मार्केट बंद राहणार आहे. २३ तारखेला माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीमुळे सुट्टी असून २५ मार्चला गुढीपाडव्यामुळे मार्केट बंद राहणार आहे.