नवी मुंबई : महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव असलेल्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी जनजागृतीसाठी बा रायगड परिवार संस्थेच्या चार सदस्यांनी साल्हेर ते पारगड पदभ्रमंती मोहीम सुरू केली आहे. सह्याद्रीच्या कुशीतून जवळपास ७०० किलोमीटर अंतर पार करून वाटेतील गड-किल्ल्यांना भेटी देण्यात येणार आहेत. या भ्रमंतीदरम्यान नागरिकांमध्ये गडसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.
गड संवर्धनासाठी श्रमदान मोहीम राबविणाऱ्या प्रमुख संस्थांमध्ये बा रायगड परिवाराचाही समावेश आहे. सुधागडसह अनेक किल्ल्यांवर नियमित संवर्धनाचे काम सुरू आहे. नागरिकांसाठी किल्ले दर्शनासाठी मोहिमांचेही आयोजन केले जाते. संस्थेचे सदस्य संतोष आलम, चेतन चव्हाण, संदीप धोदरे व संदीप चौगुले यांनी दि. १६ नोव्हेंबरपासून दुर्ग साल्हेर ते दुर्ग पारगड अशी पदभ्रमंती मोहीम सुरू केली आहे. सह्याद्रीच्या पश्चिम घाटामधील उत्तर दक्षिण या डोंगर रांगांमधून ही भ्रमंती केली जाणार आहे. या वाटेमध्ये जवळपास ४१ किल्ले आहेत. यामधील जास्तीत जास्त किल्ल्यांनाही मोहिमेदरम्यान भेटी दिल्या जाणार आहेत. गड, किल्ले हेच महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव आहे. हे वैभव टिकले पाहिजे, त्याचे संवर्धन झाले पाहिजे. संवर्धनाच्या मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने त्यांचे योगदान दिले पाहिजे. गडसंवर्धनासाठी जनजागृती व्हावी व ही चळवळ घराघरामध्ये पोहोचविण्यासाठीची जनजागृती या अभियानाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील साल्हेर ते कोल्हापूरमधील पारगडपर्यंतच्या या मोहिमेमध्ये इतर शिवप्रेमी नागरिकही सहभागी होणार आहेत. साल्हेरपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेतून जवळपास एक महिना पदभ्रमंती सुरू राहणार आहे. वाटेतील गावांमध्ये व जिथे जागा मिळेल तेथे मुक्काम करून भेटणाऱ्या नागरिकांना गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.
गड-किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी साल्हेर ते पारगड मोहीम सुरू केली आहे. सह्याद्रीच्या डाेंगररांगेतून प्रवास करताना वाटेतील गड-किल्ल्यांना भेट देण्यात येणार आहे. - संतोष आलम, सदस्य, बा रायगड परिवार
अभियानाच्या वाटेवरील ठिकाणेसाल्हेर, सलोटा, हातगड, वाघेरा, भास्करगड, त्रिंगलवाडी, कळसुबाई, कुलंग, मदन, अलंग, रतनगड, कात्राबाई खिंड, हरिश्चंद्रगड, सिंदोळा, नाणेघाट, ढाकोबा, भीमाशंकर, भोरगिरी, कुसूरपठार, ढाकगड, राजमाची, कोरीगड, घनगड, ताम्हीणी, कोकणदिवा, कावल्या बावल्या खिंड, रायगड, माधेघाट, मोहनगड, कोळेश्वर, महाबळेश्वर, प्रतापगड, मधुमकरंद गड, महिमानगड, वासोटा, जंगली जयगड, भैरवगड, विशाळगड, मुदगड, गगनबावडा, पारगड.