सलून, ब्युटी पार्लर व्यावसायिक संकटात; नवी मुंबईत ४००० जणांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 12:13 AM2021-04-06T00:13:39+5:302021-04-06T00:13:54+5:30

नाभिक समाज हवालदिल; मुलांच्या शिक्षणाची चिंता

Salons, beauty parlors in business crisis; 4,000 people starve in Navi Mumbai | सलून, ब्युटी पार्लर व्यावसायिक संकटात; नवी मुंबईत ४००० जणांवर उपासमारीची वेळ

सलून, ब्युटी पार्लर व्यावसायिक संकटात; नवी मुंबईत ४००० जणांवर उपासमारीची वेळ

googlenewsNext

नवी मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन केल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता अनेक छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणेसुद्धा अवघड झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलून, ब्युटीपार्लर बंद करण्याचे निर्देश दिल्यामुळे नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या आठ विभागात २९ गावांसह सुमारे ४००० सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायावर उपासमारीची वेळ आली आहे.

एक वर्षभर बरेचसी आर्थिक आवक ठप्प झाल्याने घरातील जीवनावश्यक गोष्टी कशा पूर्ण करायच्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढेल, या पार्श्वभूमीवर सलून व्यवसाय सुरू ठेवण्यास बंदी केल्यामुळे सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत शासनाचे नियम पाळून व्यवसाय सुरू ठेवण्याची मेहेरबानी करून परवानगी द्यावी, अशा मागण्या सलून व्यावसायिकांनी केल्या आहेत. बहुतेक सलून व्यावसायिक केवळ याच व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवत आहेत इतर कोणताही दुसरा जोडधंदा नाही. त्यामुळे घरातील कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी तसेच शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलांचा खर्च तसेच दैनंदिन खर्च यासाठी पैसा कुठून उपलब्ध करावा, याची विवंचना त्यांना आहे. हातावर पोट असलेला नाभिक समाज कोरोनामुळे पुरता अडचणीत सापडला  आहे.

“सरकारने शनिवार आणि रविवारी दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे आताही ब्युटीपार्लर बंद राहणार आहेत. दुकानाचे आणि घरांचे थकीत वीज बिले, घरभाडे शाळेची फी अद्यापही पूर्ण भरता आलेली नाही. उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनीही पाठ फिरवल्यामुळे गेले वर्षभर आर्थिक समस्यांना कंटाळून आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.    - प्रिया गोळे, 
    ब्युटीपार्लर व्यावसायिक, वाशी.

कोरोना महामारीच्या काळात नाभिक समाज सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. शांत, संयमी आमचा नाभिक समाज सरकारला नेहमीच सहकार्य करीत आला आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजवर समाजाने नेहमीच स्वतःसोबत ग्राहक वर्गाचीही योग्य ती खबरदारी, काळजी घेऊन मोडकळीस आलेला आपला व्यवसाय सावरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.२८ जून २०२० पासून सुरू झालेला धंदा आजपर्यंत डळमळीत आहे.
- नरेश गायकर, अध्यक्ष, नाभिक विकास फाउंडेशन

Web Title: Salons, beauty parlors in business crisis; 4,000 people starve in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.