वीरपत्नीला 'सॅल्यूट'! शहीद पतीच्या स्वप्नपूर्तीसाठी सैन्यदलात, अव्वल गुणांसह परीक्षा उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 09:03 PM2019-07-28T21:03:52+5:302019-07-28T22:02:45+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वीरमरण आले होते.
ठाणे - दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या महाराष्ट्रपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी सैन्यदलात भरती होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. विशेष, म्हणजे पतीला वीरमरण प्राप्त होऊन एक वर्षही उलटले नाही, तोपर्यंतच कनिका यांनी सैन्यदलात भरती होण्यासाठीच्या परीक्षाही अव्वल गुण घेत पास केल्या आहेत. या वीरपत्नीचा हा निर्णय आणि सैन्यदलाबद्दलचा अभिमान नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वीरमरण आले होते. कौस्तुभ राणे असे या शहीद जवानाचे नाव असून ते मीरा रोड येथील शितल नगर येथे राहत होते. भारतीय सैन्याच्या 36 रायफल बटालियनमध्ये ते मेजर म्हणून कार्यरत होते. 7 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी दहशतवाद्यांशी लढताना या भूमिपुत्राने देशासाठी बलिदान दिले. या वृत्ताने मुंबईसह महाराष्ट्रावर हळहळला होता. तर राणे कुटुंबीयांचा अभिमानही अवघा देश बाळगत होता. आता, पुन्हा एकदा राणे कुटुबीयांचा आणि शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नीचा देशाला अभिमान वाटणार आहे. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना जाऊन अजून वर्षही झालं नाही. येत्या 7 ऑगस्टला त्या घटनेला एक वर्ष होईल. पतीच्या निधनाला एक वर्ष होण्याआधीच त्यांच्या अकाली निघून जाण्याच्या धक्क्यातून, दुःखातून स्वतःला सावरत, एका छोट्या मुलाचा सांभाळ करत शहीद मेजर राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
कनिका राणे यांनी वर्षभरातच सैन्यदलात भरती होण्यासाठी हवी असणारी सर्व पूर्वतयारी त्यांनी केली असून परीक्षाही दिल्या आहेत. सैन्यात भरती होण्यासाठी कनिका राणे यांनी दिलेल्या परीक्षेत त्या अव्वल क्रमांकाने उत्तीर्णही झाल्याची माहिती आहे. याशिवाय लवकरच पुढील ट्रेनिंगसाठी चेन्नईला जाणार आहेत. एक पती म्हणून कनिका राणे यांच्या जगण्याचा खंबीर आधार असणाऱ्या शहीद मेजर राणे यांच्या वीरमरणानंतर स्वतःला सावरणं, त्यातही पुन्हा स्वतः सैन्यात जाण्याचा निर्णय घेणं, त्यासाठी आवश्यक त्या परीक्षांची तयारी करणं, त्यातही अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होणं आणि भरती होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वर्षभराच्या ट्रेनिंगसाठी चेन्नई येथे जायला सज्ज होणं हे कनिका राणे यांचे निर्णय अजोड ध्येयवादाची साक्ष देणारे आहेत. तसेच, आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकत देशसेवा करुन देशाला आदर्शपत्नीची प्रेरणा देणारे आहेत.
देशासाठी सैन्य दलात भरती होण्याची लहानपणा पासुनच आवड होती. कौस्तुभला देशासाठी अजुन खुप काही करायचे होते. त्याचे स्वप्न लष्करात जाऊन मी पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे असं कनिका म्हणाल्या . आपलं लहान मुल आणि पत्नी मागे असताना देखील कौस्तुभने आधी देशाचा विचार केला. आपल्या वडिलांनी देशासाठी सैन्यात दाखल होऊन जे केले ते लहानगा अगस्त्य पाहु शकला नाही. पण आपली आई देशासाठी सैन्यात दाखल होऊन काय करतेय हे तो प्रत्यक्ष पाहिल तेव्हा त्याला सैनिक काय हे कळेल असं कनिका म्हणाल्या.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठा घातपात घडवण्याचा कट रचला जात होता. मात्र, भारतीय सैन्यातील सतर्क जवानांनी घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या या दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडला. दहशतवादविरोधी कारवाई करताना जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, या चकमकीत चार जवानांना वीरमरण आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे हे शहीद झाले होते.
पतीच्या निधनानंतर वीरपत्नी कनिका राणे, यांच्या त्यागाला, संघर्षाला आणि ध्येयवादाला नक्कीच सॅल्यूट करायला हवा...!