अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : कोरोना संसर्गात वाढ झाल्याने राज्यभरात संचारबंदीचे निर्बंध लावले आहेत. त्यानुसार बाह्य जिल्ह्यात प्रवास सर्वांसाठी नाकारत अत्यावश्यक सेवेसाठी एसटी बस सेवा सुरू ठेवण्यात आली आहेत. असे असतानाही पनवेल आगारात अनेक प्रवासी रुग्णालयात जायचे आहे. नातलगाच्या अंत्यसंस्काराला जायचे आहे. यासाठी वाहक बरोबर वादावादी केली जात आहे. अशी अनेक कारणे देत बसेसमधून प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे बस वाहकाची डोकेदुखी वाढली आहे.
राज्य शासनाकडून वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता ३० एप्रिलपर्यंत संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर हा लॉकडाऊन पुढे १५ तारखेपर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी एसटी बसने प्रवास करण्यास महामंडळाची सेवा बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना प्रवासास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार पनवेल बसस्थानक येथून उरण, दादर, ठाणे, अलिबाग, कर्जत, कल्याण या शहरात अत्यावश्यक सेवा देण्यात येत आहे.
बसमधून २१ प्रवासी सोशल डिस्टन्सिंगनुसार प्रवास केला जातो आहे. इतर आगारातून पनवेल बसस्थानकात आलेल्या बसमधून अत्यावश्यक सेवेतील नागरिक प्रवास करत आहेत. इतर प्रवासीदेखील अत्यावश्यक सेवेचे कारण सांगत प्रवासासाठी येत आहेत. अंत्यसंस्काराला जायचे आहे, असे कारण सांगत बसमध्ये प्रवेश करतात. नागरिकांनी बाहेर पडू नये यासाठी शासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. तरीदेखील काही जण याकडे दुर्लक्ष करत आहेत.
दादर मार्गावर अधिक गर्दीपनवेल बसस्थानकातून दादरला जाण्यासाठी गर्दी आहे. रुग्णालय कर्मचारी, पोलीस, पालिका कर्मचारी असे अनेक जण बसचा आधार घेत आहेत. त्यापाठोपाठ ठाणे येथे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दुपारी प्रवासी संख्या कमी असते. तर सकाळ-संध्याकाळ प्रवास करण्याची संख्या लक्षणीय आहे.
पनवेल येथून दादर, ठाणे, कल्याण, अलिबाग येथे अत्यावश्यक सेवा देण्यात येत आहे. ओळखपत्र तपासून त्यांना बसमध्ये प्रवेश दिला जात आहे. सर्वसामान्य नागरिक सहसा प्रवास करत नाहीत. आले तर वाद होतात; परंतु त्यांना समजावून सांगितले जात आहे. - विलास गावडे, पनवेल आगार प्रमुख