समीर दुंदरेकर यांचे विचुंबे गावात उत्साहात स्वागत, सैन्यदलातून १६ वर्षांनी झाले निवृत्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 12:28 AM2020-09-03T00:28:00+5:302020-09-03T00:28:15+5:30
ग्रामस्थांच्या वतीने फौजी दुंदरेकर यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता.
पनवेल : पनवेल तालुक्यातील विचुंबे गावचे सुपुत्र समीर दुंदरेकर हे १६ वर्षांनी भारतीय सैन्यदलातून देशसेवा करून निवृत्त झाले. त्यांचे बुधवारी गावात उत्साहात स्वागत झाले. त्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने फौजी दुंदरेकर यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात समीर दुंदरेकर यांच्या सर्व कुटुंबीयांतर्फे केक कापून स्वागत करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना, मी देशसेवा करताना मला माझ्या गावाचे आणि कुटुंबीयांचे सहकार्य लाभले. माझी देशसेवा जरी सुखरूप झाली असली, तरी काही प्रसंगांना मला सामोरे जावे लागले. आज युवापिढीमध्ये देशाभिमान वृद्धिंगत होण्याची गरज आहे, असे दुंदरेकर यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच संजय म्हात्रे यांनी, दुंदरेकर हे आमच्या गावचे एकमेव सैनिक असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगितले. या समारंभात दुंदरेकर यांचे भाऊ सचिन दुंदरेकर यांचा पनवेल महानगरपालिकेत कोरोना काळात चांगल्या प्रकारे सेवा बजावली असल्याने त्यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार करण्यात आला.