उरण : करंजा बंदरात नांगरून ठेवलेल्या मच्छीमार बोटीचा नांगराचा दोर तुटल्याने मध्यरात्रीच्या सुमारास ही बोट उरणच्या पीरवाडी समुद्रातील खडकावर आपटून बुडाली. सुदैवाने बोटीवरील आठही खलाशी बचावले आहेत. मात्र, बोटीचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबईतील भाऊचा धक्का येथून ‘समुद्रिका’ ही मासेमारी बोट घेऊन बोटीवरील तांडेल करंजा बंदरात आले होते. मासेमारीसाठी जाण्यासाठी बोटीत डिझेल, बर्फ, रेशन, जाळी आदी सामान भरून ठेवले होते. रात्र झाल्याने बोटीतील आठ खलाशी आणि तांडेल यांनी करंजा बंदरालगतच्या खाडीत बोट नांगरून ठेवली होती. खलाशी साखरझोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास बोटीच्या नांगराचा दोर तुटला आणि बोट उरणच्या पीरवाडी बीचवरील खडकाळ भागात येऊन आदळली.
यामुळे फुटलेल्या ठिकाणातून पाणी शिरल्याने बोट बुडाली. यावेळी जाग आलेल्या खलाशांनी बोट खडकाळ भागातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले. आठही खलाशांनी सुखरूपपणे किनारा गाठल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, बोटीत डिझेल, बर्फ, रेशन, जाळी आदी सामान भरून ठेवलेल्या सामानासह बोटीचे नुकसान झाले आहे.