पनवेलमध्ये महास्वच्छता अभियान; शहरातील २० प्रभाग होणार चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:30 AM2019-06-02T00:30:29+5:302019-06-02T00:30:48+5:30
पालिका क्षेत्रात दहा दिवस हे अभियान राबविण्यात येणार आहे. दरवर्षी रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येतात.
पनवेल : माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पार्टी व पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते १० जून या कालावधीत महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाचा शुभारंभ शनिवारी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट जवळून करण्यात आला.
पालिका क्षेत्रात दहा दिवस हे अभियान राबविण्यात येणार आहे. दरवर्षी रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. यंदा पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला पाठिंबा म्हणून महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. महापालिकेतील सर्व २० प्रभागांमधील रस्ते साफसफाई, गटार, पदपथ, मोकळे भूखंड, सार्वजनिक बागा आदी परिसर स्वच्छ करण्यात येणार आहेत. याचबरोबर औषध फवारणी करून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यासाठी लागणारी मशनरी, मनुष्यबळ, पावडर आदी सामग्री विकास मंडळाच्या वतीने पुरवण्यात येत आहे. अभियानानंतरही परिसर कायम स्वच्छ ठेवण्यात येणार असून, यावर लक्ष देण्याची जबाबदारी मनपाचे आरोग्य निरीक्षक, नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.
स्वच्छतेचे महत्त्व मानवी जीवनात अनन्यसाधारण आहे, त्यामुळे याकडे सर्वांनी विशेष लक्ष दिले पाहिजे, असे आवाहनही रामशेठ ठाकूर यांनी या वेळी केले. अभियानात महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा संघटन सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, तालुकाध्यक्ष अरुण भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक तथा शहर सरचिटणीस नितीन पाटील, प्रभाग समिती सभापती तेजस कांडपिळे, शत्रुघ्न काकडे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अनिल भगत, संतोष शेट्टी, राजू सोनी, नगरसेविका मुग्धा लोंढे, राज्य परिषद सदस्य सी. सी. भगत आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.