पनवेल : शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कामगारांना हक्काच्या सुट्ट्या मिळणार आहेत. या पगारी रजेचा तब्बल ६५० सफाई कामगारांना लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईत उभारण्यात आलेली रेल्वे स्थानके, सिडको भवन आणि विभागीय कार्यालये, सिडकोच्या आरोग्य विभागातील उलवे, द्रोणागिरी आणि करंजाडे आदी शहरांमध्ये काम करणाºया जवळपास ६५० सफाई कामगारांना संबंधित विविध ठेकेदारांकडून कामगार कायद्यानुसार दिल्या जाणाºया हक्काच्या सुट्ट्या दिल्या जात नव्हत्या. आझाद कामगार संघटनेकडे कामगारांनी तक्रार केल्यानंतर अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी याचा पाठपुरावा सुरू केला. पत्रव्यवहार, बैठका घेतल्यानंतर सिडकोच्या रेल्वे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता सुधाकर विसाळे यांनी नवी मुंबईतील वाशी, ऐरोली, तुर्भे, राबाळे, सानपाडा, नेरुळ, सीवूड, बेलापूर आदींसह इतर सर्व प्रशासनाला २१ आॅगस्ट रोजी पत्राद्वारे आदेश दिले. कामगारांना वर्षाला २० सुट्ट्या दिल्या पाहिजेत, असे या पत्रात नमूद करण्यात आले. २६ डिसेंबर, २०१९ पासून पहिले निवेदन दिल्यानंतर सुरू केलेल्या मागणीला आठ महिन्यांनी यश आले आहे. अधीक्षक अभियंता सुधाकर विसाळे यांनी सफाई कामगारांचा पगारी रजेचा प्रस्ताव विधि विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला होता.
वरिष्ठ विधि अधिकारी प्रदीप भरड यांनी सदर सुट्ट्यांचा प्रस्ताव कामगार कायद्यानुसार मंजूर केल्याने कामगारांनी संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांचे आभार मानले आहेत. कामगारांना त्यांच्या हक्काच्या सुट्ट्या मिळत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी कामगार संघरचनेकडे तक्रार दिली होती. त्यानंतर, प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. आठ महिन्यांनी त्याची दखल घेतली.