नवी मुंबई : ऐरोली येथील जैवविविधता केंद्रात शोभिवंत माशांचे प्रजनन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बुधवारी पर्यावरण दिनी करण्यात आले. या प्रसंगी ऐरोलीच्या जैवविविधता केंद्राच्या विकासासाठी ३० कोटींची घोषणा करत त्यापैकी दहा कोटींच्या निधीला येत्या अर्थसंकल्पात मान्यता दिल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
वनखात्यामार्फत ऐरोली येथे दोन वर्षांपूर्वी किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी वनविभाग, कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शोभिवंत माशांचे प्रजनन केंद्र सुरू करण्यात आले आहे. माशांच्या तीन प्रजातींच्या एकत्रित उबवणी करणारा हा देशातील पहिलाचा प्रकल्प आहे. त्यानुसार जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या केंद्राचे उद्घाटन बुधवारी वनमंत्री तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शासनामार्फत कांदळवन प्रतिष्ठानला देण्यात आलेल्या बसचाही लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आला. तर आमदार संदीप नाईक यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ई-टॉयलेट व सॅनिटरी प्लाझाचेही उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले.
सदर कार्यक्रमप्रसंगी खासदार राजन विचारे यांनी जैवविविधता केंद्राच्या विकासासाठी वनमंत्र्यांकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार सदर केंद्राचा उत्तम पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यासाठी ३० कोटींच्या निधीची घोषणा मुनगंटीवार यांनी केली. त्यापैकी १० कोटींच्या निधीला यंदाच्या अर्थसंकल्पात मंजुरी दिलेली असल्याचेही ते आपल्या भाषणात म्हणाले.
तर आरे कॉलनी येथील १२० एकरची जागा दुर्मीळ होत चाललेल्या प्रजातींच्या संवर्धन व जतन केंद्रासाठी देण्याचे प्रस्तावित असून लवकरच त्याचा करार केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे वनविभागाने टूथपिकच्या निर्मितीवर भर दिल्याने टूथपिक आणि अगरबत्ती उत्पादनात भारत स्वावलंबी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य संकेस्थळाचे लोकार्पण व मत्स्यशेती विषयीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयवंत सुतार, आमदार रमेश पाटील, विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, महसूल विभागाचे प्रधान सचिव विकास कारगे, प्रधान मुख्य वनरक्षक एन. एच. काकोडकर, एन. वासुदेवन, विरेंद्र तिवारी, डॉ. कुलदीप के. लाल आदी उपस्थित होते.