पंढरपूर रस्त्यावर वाळूचा सडा
By admin | Published: January 13, 2017 06:10 AM2017-01-13T06:10:07+5:302017-01-13T06:10:45+5:30
महाड तालुक्यातील खाडी पट्ट्यातून जाणारा म्हाप्रल पंढरपूर रस्ता हा येथील वाळू
दासगाव : महाड तालुक्यातील खाडी पट्ट्यातून जाणारा म्हाप्रल पंढरपूर रस्ता हा येथील वाळू व्यावसायिकांचा महत्त्वाचा मार्ग झाला आहे. मुळातच या रस्त्याची दुरवस्था झाली असून त्यावर ठिकठिकाणी वाळू सांडल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. रस्त्यावर सांडलेली वाळू आणि वाहनांची वर्दळ यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
म्हाप्रल पंढरपूर हा रस्ता महाड तालुक्यातून जातो. वराठी चिंभावे ते तुडील या रस्त्यावर तीन ते चार वाळू साठवण आणि विक्री हे प्लांट आहेत. या भागातून पुणे, खेड, भोर, महाबळेश्वर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होते. या वाहतुकीकरिता प्रामुख्याने म्हाप्रळ पंढरपूर रस्त्याचाच वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लांब वाहतूक असल्याने हे वाहतूकदार गाडीमध्ये जास्तीत जास्त वाळू भरतात. छोटे-मोठे खड्डे आणि गतिरोधक यावर गाडी आदळताच गाडीच्या फाळक्यातून अगर वरून वाळू सांडते. सातत्याने अशाप्रकारे वाळू सांडल्याने या रस्त्यावर वाळूचा सडा पडला आहे. ही अवस्था ओवळे, जुई, कुंभळे, रावढळ, सव, तुडील आदी गावांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. मुळातच हा रस्ता खराब असून त्यावर सांडलेली ही वाळू आणि वजनी गाड्यांची वाहतूक यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. मात्र, येथील स्थानिक वाहतूक करणाऱ्या मिनीडोअर रिक्षांना याचा त्रास होत आहे. तर सांडलेल्या वाळूचे प्रमाण अधिक असल्याने अनेक ठिकाणी रस्ता निसरड झाला आहे. यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताची भीती वाढली आहे. या धुळीचा त्रास रस्त्यालगत असणाऱ्या रहिवाशांना होऊन त्यांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे. (वार्ताहर)
खाडी पट्ट्या विभागात असलेल्या वाळू डेपोमधून मोठ्या प्रमाणात ट्रक व्दारे ओव्हर लोड वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाळू रस्त्यावर सांडत असून या सांडलेल्या वाळूमुळे छोट्या-मोठ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
- अण्णा अहमदखान देशमुख, समाजसेवक, खाडी पट्ट्या विभागात