संदीप तटकरेंचा मार्ग एकला चलो रे...
By admin | Published: November 7, 2016 03:00 AM2016-11-07T03:00:00+5:302016-11-07T03:00:00+5:30
रोहा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. अवधूत तटकरे यांचे धाकटे बंधू संदीप तटकरे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेते मंडळींबरोबर नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून
रोहा : रोहा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. अवधूत तटकरे यांचे धाकटे बंधू संदीप तटकरे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेते मंडळींबरोबर नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यातच रोनप निवडणुकीतील सेनेचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार दीपक तेंडुलकर यांचा अर्ज छाननीत बाद झाला. यामुळे सेनेचे जिल्हाप्रमुख रवी मुंढे, तालुकाध्यक्ष संजय देशमुख यांच्यावर टीका होत होती. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री तथा रायगडचे खा. अनंत गीते यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालत संबंधितांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर युद्धपातळीवर चर्चा होवून सेना भवनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे असलेल्या संदीप तटकरे यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित करण्यात आले. संदीप तटकरे यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला असला तरी तांत्रिक अडचणींमुळे शिवसेनेत संदीप तटकरे यांना एकला चलो रे या भूमिकेतून काम करावे लागणार आहे.
सेनाभवन येथे अनंत गीते यांच्या हस्ते भगवी शाल व शिवबंधन बांधून संदीप तटकरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदेश बांदेकर, आ. भरत गोगावले, जिल्हा प्रमुख रवी मुंढे, प्रकाश देसाई, बाळशेट लोखंडे, अनिल नवगणे, विलास गोळे, तालुकाध्यक्ष संजय देशमुख, नितीन तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. संदीप तटकरे यांचे वडील अनिल तटकरे व त्यांचे बंधू अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. तसेच संदीप तटकरे यांच्या मातोश्री शुभदा तटकरे या राष्ट्रवादीच्या जिल्हापरिषद सदस्या आहेत. यामुळे संदीप तटकरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाचा कार्यक्र मासाठी संदीप तटकरे यांच्या व्यतिरिक्त घरातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. पक्ष प्रवेशानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मी कोणालाही आव्हान देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही, असे संदीप तटकरे यांनी सांगितले आहे.
संदीप तटकरे यांनी अधिकृ तरीत्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदीप तटकरे असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तटकरे कुटुंबातील कौटुंबिक कलहाची चर्चा होत होती. अनेक कार्यक्र मामधून सुनील तटकरे व अवधूत तटकरे यांच्यातील विसंवाद समोर येत होता. मात्र याबाबत दोन्ही बाजूकडून कधीही वाच्चता झाली नव्हती. (वार्ताहर)
सुनील तटकरेंपुढे मोठे आव्हान
पक्षातील काही नाराजांनी नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहे. यामुळे अगोदरच विविध समस्यांच्या फे ऱ्यात अडकलेल्या सुनील तटकरे यांना त्यांचा पुतण्या संदीप तटकरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नवे आव्हान समोर उभे राहिले आहे. संदीप तटकरे यांचे बंधू आ.अवधूत तटकरे यांनी दीर्घकाळ रोहा शहराचे नगराध्यक्ष पद भूषविले आहे. अवधूत तटकरे यांना मानणारा तरूणवर्ग तसेच मुस्लीम समाजात देखील त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तांत्रिक अडचणींमुळे अवधूत तटकरे व अनिल तटकरे हे निवडणूक प्रचारात उघडपणे सहभागी होवू शकत नसले तरी संदीप तटकरे यांना निवडून आणण्यात त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असणार.