जुईनगरच्या नाल्यात रेतीउपसा
By admin | Published: January 14, 2017 07:11 AM2017-01-14T07:11:25+5:302017-01-14T07:11:25+5:30
जुईनगर रेल्वे स्टेशनसमोरील नाल्यामध्ये अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे रेती उपसा सुरू आहे. केमिकलमिश्रित पाण्यातून रेती
नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्टेशनसमोरील नाल्यामध्ये अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे रेती उपसा सुरू आहे. केमिकलमिश्रित पाण्यातून रेती काढून बांधकामासाठी विकली जाते. महसूलची यंत्रणा नसल्याने व पालिका दुर्लक्ष करत असल्याने बिनधास्तपणे हा व्यवसाय सुरू आहे.
औद्योगिक वसाहतीमधील पावसाळी पाणी जुईनगरच्या नाल्यातून खाडीपर्यंत जाते. वास्तविक पावसाळा संपला की नाला कोरडा असणे आवश्यक आहे. पण औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाणी कारखानदार रात्री या नाल्यात सोडत असल्याने पावसाळ्यानंतरही नाल्यातून पाणी वाहत असते. केमिकलच्या दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. यामध्ये आता अवैध रेती उपसाची भर पडली आहे. रेल्वे स्टेशनसमोर चार ते पाच कामगार दिवसभर रेती उपसा करतात. काढलेली रेती चाळून ती बांधकामांसाठी विकली जात आहे. वास्तविक नाल्यातील रेतीचा वापर केल्याने बांधकाम निकृष्ट होण्याची शक्यता आहे. पण तरीही पावसाळ्यानंतर हा व्यवसाय सुरूच आहे. (प्रतिनिधी)