नेरूळमध्ये आमदार निधीतून स्वच्छतागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:52 AM2018-06-01T01:52:32+5:302018-06-01T01:52:32+5:30
स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून नेरूळ सेक्टर १८ येथे एक सुसज्ज स्वच्छतागृह उभारले आहे.
नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून नेरूळ सेक्टर १८ येथे एक सुसज्ज स्वच्छतागृह उभारले आहे. पामबीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर हे स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे स्वच्छतागृह सोयीचे ठरले आहे.
महापालिकेच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी ई-टॉयलेट उभारले आहेत. परंतु नियमित देखभाल तसेच विविध तांत्रिक अडचणीमुळे या ई-टॉयलेटचा नागरिकांना फारसा लाभ होताना दिसत नाही. पामबीच मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात रहिवासी येतात. या मार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर सकाळ, संध्याकाळ नागरिकांची एकच गर्दी असते. परंतु या ठिकाणी एकही स्वच्छतागृह नसल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांनी नेरूळ सेक्टर १८ येथे पामबीच मार्गाजवळ स्वच्छतागृह उभारण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून या ठिकाणी सुसज्ज असे स्वच्छतागृह उभारले आहे. अलीकडेच ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.