नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त शहरातील स्वच्छता दूत असलेल्या कर्मचाऱ्या सत्कार करण्यात आला. कोरोना काळात अविश्रात परिश्रम घेणाऱ्या डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी कौतुक करून लोकाभिमुख प्रशासनावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.
पालिकेच्या २९व्या वर्धापन दिनानिमित्त मनपा मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमात साफसफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वच्छता दूतांमुळे महानगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामाची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर व इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. यामुळे कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.
स्वच्छतेमध्ये पहिला क्रमांकाचे ध्येय ठेवतानाच लोकाभिमुख प्रशासनावर भर देण्यात येणार आहे. झीरो गार्बेज इन रोड हे ध्येयही निश्चित करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी आरंभ क्रिएशनच्या कलाकारांनी स्वच्छताविषयक पथनाट्यही सादर करण्यात आले. महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी वर्धापनदिनानिमित्त स्वच्छतेची शपथ घेतली.