स्वच्छता अधिकाऱ्यांना कामचुकारपणा भोवला; आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस 

By नामदेव मोरे | Published: June 8, 2023 06:36 PM2023-06-08T18:36:50+5:302023-06-08T18:37:37+5:30

पावसाळापूर्व नालेसफाईची महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अचानक पाहणी केली.

Sanitation officials were found guilty of malpractice Show Cause Notice issued by the Commissioner | स्वच्छता अधिकाऱ्यांना कामचुकारपणा भोवला; आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस 

स्वच्छता अधिकाऱ्यांना कामचुकारपणा भोवला; आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस 

googlenewsNext

नवी मुंबई: पावसाळापूर्व नालेसफाईची महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अचानक पाहणी केली. कोपरखैरणे व घणसोलीतील नालेसफाई समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे तेथील स्वच्छता अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. आयुक्तांनी शहरातील सर्व विभागातील पावसाळापूर्व कामांची पाहणी सुरू केली आहे. शिरवणे मार्केटपासून सुरुवात करीत कोपरखैरणे - घणसोली नाल्यापर्यंत विविध भागांमधील स्वच्छता स्थितीची ऑन द स्पॉट जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यामध्ये आयुक्तांनी नेरूळ, शिरवणे, जुईनगर, सानपाडा, तुर्भे, एपीएमसी, वाशी तसेच कोपरखैरणे या विभागातील विविध सेक्टर्स, वाणिज्य भाग यामधील स्वच्छता स्थितीची पाहणी केली.

सोसायट्यांची बॅकलेन कायम स्वच्छ हवी
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने सर्व सोसायट्यांच्या बॅकलेन कायम स्वच्छ राहतील याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. दररोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या, संस्था यांनी त्यांच्या ओल्या कचऱ्यावर त्यांच्याच आवारात प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यास सांगितले.

नादुरुस्त लीटर बीन्स दुरुस्त करा
सेक्टर २९ वाशी येथील प्रेसिडेंट पार्क तसेच सेक्टर १४ कोपरखैरणे येथील ब्रेव्हर्ली पार्क या सोसायट्या घनकचरा प्रक्रियेची आयुक्तांनी पाहणी केली. ठिकठिकाणी लावलेल्या लीटर बीन्सची सफाई करून त्या नादुरुस्त असल्यास किंवा लावलेल्या जागेवर नसल्यास त्याची माहिती त्वरित अभियंत्यांना द्यावी, असेही स्वच्छता निरीक्षकांना निर्देशित केले.

सार्वजनिक शौचालयात पाणीच नाही
ब्लू डायमंड हॉटेल, कोपरखैरणेसमोरील सार्वजनिक शौचालय पाणी नसल्याने बंद आढळल्याने संबंधितांना जाब विचारत कोणतेही शौचालय नागरिकांना वापरता येणार नाही अशाप्रकारे बंद ठेवलेले आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे स्पष्ट करून केअर टेकरकडून होत असलेला कंटेनरचा निवासी वापर तत्काळ बंद करण्यास सांगितले.

होर्डिंगमुळे होणारे विद्रूपीकरण थांबवा
कुठेही, कशाही प्रकारे लागलेल्या होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याने त्याविराेधात मोहीम राबवण्याचे निर्देश दिले. वाणिज्य संकुल भागात अतिक्रमण नसावे याबाबत यापूर्वीच दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने याकडे लक्ष देण्याचे निर्देशही दिले.

नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य द्या
नागरिकांकडून विविध माध्यमांतून व प्रसारमाध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या स्वच्छतेबाबतच्या तक्रारी याकडे सकारात्मकतेने लक्ष देऊन त्यांचे तत्परतेने निवारण करावे. या दौऱ्यात आयुक्तांसमवेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे डॉ. बाबासाहेब राजळे, सहायक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे उपस्थित होते.

Web Title: Sanitation officials were found guilty of malpractice Show Cause Notice issued by the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.