नवी मुंबईमध्ये पहिल्या दिवशी 18 वर्षांवरील 183 जणांना दिली लस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 01:15 AM2021-05-02T01:15:26+5:302021-05-02T01:15:35+5:30
२०० जणांनी केली होती नोंदणी : १५ मिनिटांत बुकिंग पूर्ण, एकाच केंद्रावर लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शासनाच्या सूचनेप्रमाणे नवी मुंबईमध्येही १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र लसीचा तुटवडा असल्याने एकच केंद्र सुरू केले असून, पहिल्या दिवशी २०० जणांनी नोंदणी केली. त्यापैकी १८३ जणांना देण्यात आली. अश्विनी थोन्टाकुडी (वय २८) यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.
शासनाने १८ वर्षांवरील नागरिकांना १ मेपासून लस देण्याची घोषणा केली होती. परंतु लसीचा तुटवडा असल्याने प्रत्यक्षात लसीकरण सुरू होणार की नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात होती. लसीकरण पुढे ढकलण्यात येणार असल्याचेही बोलले जात होेते. परंतु शेवटच्या क्षणी ठाणे जिल्ह्यात ५ केंद्रे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामध्ये नेरूळ सेक्टर १५ मधील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयाचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या ‘कोविन’ पोर्टलवर रीतसर नोंदणी केल्यानंतर व त्यावर केंद्र निवडून अपॉइंटमेंट आरक्षित केल्यानंतरच संबंधितांचे लसीकरण केले जात आहे.
रात्री उशिराने सदर पोर्टलवर अपॉइंटमेंट बुकिंग लिंक प्रदर्शित झाल्यावर १५ मिनिटांतच पहिल्या दिवसाच्या २०० लाभार्थ्यांनी अपॉइंटमेंट आरक्षित केली. या लाभार्थ्यांचे लसीकरण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर स्थापित बूथमध्ये कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून दुपारी १ वाजता सुरू करण्यात आले.
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लस घेण्यासाठी शासकीय निर्देशानुसार ‘कोविन पोर्टल’वर रीतसर नोंदणी करणे अनिवार्य आहे. केवळ ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांचेच लसीकरण केले जाणार आहे. ही नोंदणी झाल्यानंतर पोर्टलवर आपल्या सोयीचे लसीकरण केंद्र निवडून त्या ठिकाणी दिनांक निवडून आपली अपॉइंटमेंट आरक्षित करावयाची आहे; आणि त्या वेळेला, त्या केंद्रावर जाऊन लस घ्यावयाची आहे, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.