नवी मुंबई : लोकमतचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नेरुळमधील डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान हे शिबिर होणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, देशभरात सर्वत्र रक्ताची कमतरता भासू लागली आहे. रक्तदान शिबिराची संख्याही कमी झाली असून, स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या मनातही असुरक्षितता निर्माण होऊ लागली होती. रक्ताच्या अपुºया साठ्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये किंवा कोणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन रक्तदानाविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमतचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांची २ जुलैला जयंती आहे. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेरुळमधील डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान हे शिबिर शासनाच्या नियम व निकषानुसार आयोजित केले आहे. त्यात प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी, मास्कचा वापर, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी व रक्तदान करण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छेने पुढे यावे, असे आवाहन या निमित्ताने करण्यात येणार आहे.रक्तदाते जीव वाचविण्याचे काम करत असतात. अनेक आजारांमध्ये रुग्णांना नियमित रक्ताची गरज असते. वेळेत रक्त मिळाले नाही, तर जीव जाण्याची शक्यता असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज वाढत आहे. त्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे. - प्राची नायर, मुख्य प्रशासक, डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालय रक्तपेढी