- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील वाशी-सानपाडा दरम्यानचा जुई पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. पुलाच्या दोन सांध्यांमध्ये मोठी फट असल्याने त्याठिकाणी सातत्याने अपघात होत असून, आजवर पाच जणांचा बळी गेला आहे. यानंतरही पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संतप्त प्रवाशांकडून होत आहे.सायन-पनवेल मार्गाच्या रुंदीकरणावेळी वाशी- सानपाडा दरम्यानच्या जुई पुलाचीही रुंदी वाढवण्यात आलेली आहे. या वेळी पुलाचा जुना व नवा भाग जोडण्यासाठी सांध्याच्या ठिकाणी रेल्वे रुळासारखा लोखंडी रॉड वापरण्यात आलेला आहे. सुमारे ७० ते ८० मीटर लांबीचा हा रॉड आहे, परंतु दोन रॉडमध्ये मोठी फट शिल्लक राहिल्याने त्याठिकाणी अपघात घडत आहेत. दोन रॉडमध्ये सुमारे ७ सेंमीची फट असून, उंचीतही सुमारे ५ ते ६ सेंमीचा फरक आहे. यामुळे पुलाच्या या भागावर दुचाकीचे चाक गेल्यास सांध्यातील उंचीच्या फरकामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. या प्रकारामुळे त्याठिकाणी दररोज किमान तीन ते चार अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये मागील तीन वर्षांत पाच जणांचा बळी देखील गेलेला आहे. प्रतिवर्षी किमान दोघांचा त्याठिकाणी अपघाती मृत्यू होत आहे. आजवर शंभरहून अधिक किरकोळ अपघातांमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. त्यापैकी मोजक्याच गंभीर अपघातांची नोंद वाशी पोलीस ठाण्यात झालेली आहे. उर्वरित अपघातांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींनी पोलिसांकडे तक्रारीऐवजी परस्पर उपचार करून घेतलेले आहेत. त्यांना वेळीच प्रत्यक्षदर्शींकडून मदत मिळाल्याने त्यांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.पुलाच्या दोन सांध्यातील फट रात्रीच्या वेळी सहज दिसत नसल्याने त्यावरून दुचाकीचे चाक घसरून बहुतांश अपघात घडत आहेत. अशावेळी पाठीमागून येणाºया भरधाव ट्रक अथवा कारची धडक बसल्यास त्यांना मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे. तिथली अपघातांची मालिका थांबवण्याकरिता पुलाच्या सांध्यामधील अंतर कमी करणे आवश्यक आहे. याकरिता वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे व वाशी वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे. त्यानुसार अवघ्या चार दिवसांत दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांनी गतवर्षी पोलिसांना दिले होते. त्यानंतरही अद्याप कामाला सुरुवात न झाल्याने तिथली अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी रात्री त्याठिकाणी काही मिनिटाच्या अंतराने चार दुचाकीस्वारांचा अपघात झाला असता थोडक्यात त्यांचे प्राण वाचले. पुलाच्या दोन सांध्यामधील अंतर कमी करून अपघात टाळण्यासाठी साधारण लाखभर रुपये खर्चाची शक्यता आहे. परंतु या खर्चावरून पीडब्ल्यूडी व टोलवेज कंपनी हात झटकत असल्याने त्यांच्यातील वाद सर्वसामान्यांच्या जिवावर बेतत आहे.गुन्हा दाखल करण्याची मागणीसायन-पनवेल मार्गावरील उरण फाटा येथील पुलावर प्रमाणापेक्षा अधिक डांबर टाकल्याने रस्ता गुळगुळीत झाला होता. यामुळे त्याठिकाणी अपघात होऊन एका टेंपो चालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात सायन-पनवेल टोलवेज कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्यानुसार जुई पुलावर आजवर घडलेल्या अपघातामध्ये पाच जणांचा बळी घेतल्याप्रकरणी देखील ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.जुई पूल मृत्यूचा सापळा बनला असून, त्याठिकाणी दररोज चार ते पाच दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. अनेक जण थोडक्यात मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले असून, काहींचा बळी देखील गेलेला आहे. परंतु तक्रार करून देखील पीडब्ल्यूडी विभाग पुलावरील सांध्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. यावरून अपघातांमधील जखमींवर उपचाराच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांची दुकानदारी सुरू ठेवण्यात आलेली आहे.- नागेश पवार,चेंबूर- प्रवासी
सानपाडा पूल बनला मृत्यूचा सापळा; टोलवेज कंपनीसह पी.डब्ल्यू.डी.चा हलगर्जीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 3:10 AM