नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबईमध्ये आलेल्या दुष्काळग्रस्तांसह बेघर नागरिकांसाठी सानपाडा पादचारी पूल आधार बनला आहे. दिवसभर मिळेल ते काम करून १०० पेक्षा जास्त निराश्रित रात्रीच्या मुक्कामासाठी पुलाचा वापर करत आहेत. स्मार्ट सिटीमध्ये हक्काचा निवारा नसलेल्यांसाठी हाच सर्वोत्तम व सुरक्षित पर्याय ठरला आहे.
राज्यासह देशामध्ये सर्वत्र दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. गावाकडे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. रोजगारही नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्यामुळे अनेकांनी मुंबई व नवी मुंबईकडे प्रस्थान केले आहे. शेकडो दुष्काळग्रस्तांनी सानपाडामधील उड्डाणपूल व मोकळ्या भूखंडांवर आश्रय घेतला आहे. पुलाखाली दगडाची चूल करून त्यावर स्वयंपाक केला जातो. दत्तमंदिर व इतर ठिकाणावरून पाणी उपलब्ध केले जाते. सकाळी लवकर स्वयंपाक उरकून तुर्भे, नेरुळ व इतर नाक्यांवर कामाच्या शोधात जायचे व पुन्हा रात्री पुलाखाली येवून जेवण करायचे हा अनेक बेघरांचा रोजचा शिरस्ता. दिवसा पुलाखाली थांबता येत असले तरी रात्रीचा मुक्काम तेथे करणे सुरक्षित नसते. यामुळे रात्री मुक्कामासाठी रेल्वे स्टेशन व पादचारी पुलांचा आश्रय घेतला जात आहे. बसस्टॉप व इतर ठिकाणीही सुरक्षित जागा पाहून रात्री मुक्काम केला जात आहे.
सानपाडा दत्तमंदिर पादचारी पुलामुळेही निराश्रितांना आधार मिळत आहे. रात्री १०० पेक्षा जास्त नागरिक येथे मुक्कामासाठी येत आहेत. सायंकाळी ६ नंतर पुलावर रात्रीच्या मुक्कामासाठी जागा मिळावी, यासाठी धावपळ सुरू असते. अनेक जण दिवस मावळू लागला की पुलावर जाऊन जागा पकडतात. उशीर झाल्यास पुलावर मुक्कामासाठी जागाच उपलब्ध होत नाही. निराश्रितांची संख्या वाढल्यामुळे सद्यस्थितीमध्ये पुलावरील जागाही कमी पडू लागली आहे. काही व्यक्ती स्वत:सह परिचितांसाठीही जागा धरून ठेवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, हे सर्व निराश्रित पुलाचा वापर करताना तो अस्वच्छ होणार नाही व ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेत आहेत. नवी मुंबईसारख्या शहरामध्ये वास्तव्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. पुलाखाली व मोकळ्या भूखंडावर चोरट्यांची भीती वाटते. डासांचा उपद्रवही जास्त असतो. वीज नसल्यामुळे गैरसोय होत असते. साप, विंचवाचीही भीती असते, यामुळे दिवसभर पुलाखाली थांबणारे निराश्रित रात्री मात्र पुलावर किंवा रेल्वे स्टेशन परिसराला पसंती देत आहेत.
नवी मुंबईमध्ये आलेल्या दुष्काळग्रस्तांनी सांगितले की, गावाकडे उन्हाळ्यामध्ये रोजगाराची साधने नसतात. हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ येते. यामुळे फेब्रवारी ते एप्रिलच्या दरम्यान नवी मुंबईमध्ये येतो. काही नागरिक दिवाळीनंतरच येथे येत असतात. आम्ही कुठेही अतिक्रमण करत नाही. जिथे जागा मिळेत तेथे थांबतो व पुन्हा गावाकडे जातो. आतापर्यंत महापालिका किंवा इतर कोणीही त्रास दिला नाही. अनेकांनी सहाकार्य केल्याचेही सांगितले.
गावाकडे दुष्काळाची स्थिती आहे. पिण्यासाठी पाणी नाही, हाताला रोजगार नाही, यामुळे उन्हाळ्यामध्ये रोजगारासाठी नवी मुंबईमध्ये आलो आहोत. दिवसभर नाक्यावर काम करतो व रात्रीच्या मुक्कामासाठी पादचारी पुलावर येत आहे. उड्डाणपुलाखाली रात्री थाबणे असुरक्षित असल्यामुळे आश्रय घेत आहोत. - विठ्ठल चव्हाण, दुष्काळग्रस्त