नवी मुंबई - ठेक्यात भागीदार मिळणार या अटीवर राजाराम टोकेच्या हत्येची सुपारी इम्रान कुरेशीने उचलल्याचे तपासात समोर आले आहे. सीआयडीने मुंबईत केलेल्या शस्त्रांच्या कारवाईत तो वॉन्टेड होता.
एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील कचरा वेचण्याचा ठेकेदार राजाराम टोके यांच्यावर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही शिताफीने अटक केली आहे. अधिक चौकशीत संतोष गवळी याने इम्रान कुरेशी याला ठेक्यात भागीदारी देण्याच्या अटीवर हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. टोके यांना संपवून तो ठेका आपल्याला मिळवायचा असा त्यांच्यात कट रचला होता. त्यामध्ये इतर एकाचे नाव समोर येत असून पोलिस त्याची चौकशी करत आहेत. या व्यक्तीने गवळी व कुरेशी यांची भेट घडवून दिल्याचे समजते. पडद्याआड असलेल्या या व्यक्तीला व कुरेशीला प्रत्येकी २५ टक्केच नफा ठेक्यात दिला जाणार होता अशीही माहिती समोर येत आहे. मात्र गोळीबार केला त्यावेळी टोके गाडीत असल्याने चार गोळ्या लागूनही त्यांचे प्राण वाचले आणि त्यांचा कट फसला.
गोळीबार झाल्यानंतर गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे, सहायक निरीक्षक सतीश भोसले, महेश जाधव, श्रीनिवास तुंगेनवार, सचिन कोकरे, नीलम पवार, राहुल भदाणे, शशिकांत शेंडगे, महेश पाटील, किरण राऊत आदींचे पथक केले होते. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायलचा शोध सुरु असताना ती तुर्भे एमआयडीसी परिसरात मिळून आली. त्यावरून गवळीचा शोध घेऊन पुढे कुरेशी पर्यंत पोलिस पोहचले. कुरेशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबई, पुणे नवी मुंबईत गंभीर गुन्हे आहेत. शिवाय गतवर्षी सीआयडीने मुंबईत पकडलेल्या २५ शस्त्रांच्या गुन्ह्यातही तो वॉन्टेड होता.